pune : कुटुंबातील जमीन मोजणी २०० रुपयांत
pune :

जलद मोजणी ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक
pune : महसूल विभागाने जमीन मोजणी दर आणि मोजणीच्या प्रकारामध्ये सुटसुटीतपणा आणि सुसूत्रता आणली आहे. या निर्णयामुळे आता कुटुंबातील वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपयांत करता येणार आहे. नियमित मोजणी ९० दिवसात आणि जलद मोजणी ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महसूल विभागाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्यात नागरीकरण वेगाने होत आहे. विविध प्र्कल्पांमुळे जमिनींना आलेले सोन्याचे भाव, जमिनीबाबत असलेले हद्दीचे वाद यांमुळे जमीन मोजणीसाठी अर्ज करण्याऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात पुणे विभागासह, नाशिक, कोकण या विभागांत जमीन मोजणींचे अर्ज मोठ्या प्र्माणावर येत आहे. मात्र, अर्जांची संख्या जास्त, त्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचे अपुरी संख्या असल्यामुळे वेळेत जमिनींची मोजणी होत नाही. आता राज्य शासनाने थेट मोजणीसाठी कालमर्यादा निश्चित केल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
यासह महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत येणाऱ्या भूखंडांच्या मोजणीसाठी दीडपट शुल्क आकारण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे, तसेच निमशासकीय संस्थांना मोजणी दरात ५० टक्के, तर पूर्णतः शासकीय जमिनींना ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
असे असणार जमीन मोजणीचे दर
ग्रामीण भागासाठी (२ हेक्टरपर्यंत)
-नियमित मोजणीसाठी दोन हजार रुपये
– द्रुतगती मोजणीसाठी आठ हजार रुपये
शहरी भागासाठी (१ हेक्टरपर्यंत)
– नियमित मोजणीसाठी तीन हजार रुपये
– द्रुतगती मोजणीसाठी बारा हजार रुपये





