Pune crime : बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक
Pune crime : पाच लाख ६४ हजारांच्या बनावट नोटा जप्त; कलर प्रिंटरसह नोटा छापण्याचे साहित्य हस्तगत

Pune crime : भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पाच लाख ६४ हजार रुपये किमतीच्या एकूण एक हजार १२८ बनावट नोटा, तसेच नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारा कलर प्रिंटर, मॉनिटर, सीपीयू आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
सलमान जैनुद्दीन राजे (वय ३०, रा. आंबेगाव, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे), शाफाज फिरोज अन्सारी ( ३०, रा. नालासोपारा), विशाल विलास गलांडे ( ३७, रा. सुरुपखणवाडी, ता. माण, जि. सातारा) आणि अभिजीत रावसाहेब कांबळे ( ३०, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट नोटा घेऊन एक संशयित महात्मा फुले मंडई परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी संबंधित पथकाला कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पावणेपाचच्या सुमारास शुक्रवार पेठेतील महात्मा फुले मंडईच्या मागील बाजूस असलेल्या म्हसोबा मंदिरासमोरील अंतर्गत रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी सलमान राजे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या ८०५ बनावट नोटा आढळल्या. या नोटांचे दर्शनी मूल्य चार लाख दोन हजार ५०० रुपये होते. याप्रकरणी सचिन अहिवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
साथीदारांची नावे उघड; सातारा, कोल्हापुरात कारवाई –
अटक केलेल्या सलमान राजे याच्याकडे चौकशी केली असता, या गुन्ह्यात आणखी तीन साथीदार सहभागी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या पूर्वपरवानगीने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक सातारा आणि कोल्हापूर येथे रवाना झाले.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने शाफाज अन्सारी, विशाल गलांडे आणि अभिजीत कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली.
शाफाज अन्सारी याच्या राहत्या घरातून पाचशे रुपयांच्या ३२३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्यांचे दर्शनी मूल्य एक लाख ६१ हजार ५०० रुपये आहे. तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा ईपीएसन कंपनीचा प्रिंटर, एचपी कंपनीचा मॉनिटर, लेनोवो कंपनीचे वायरलेस की-बोर्ड व माऊस, झेब्रॉनिक कंपनीचा सीपीयू, आर्टिस कंपनीचे उपकरण आणि अन्य साहित्य असा एकूण २१ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत आरोपींकडून पाचशे रुपयांच्या एकूण एक हजार १२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, त्यांचे दर्शनी मूल्य पाच लाख ६४ हजार रुपये आहे. आरोपी बनावट नोटा तयार करून त्यांचा वापर कुठे आणि कशा प्रकारे करणार होते, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई –
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे व रमेश लाहिगुडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड व मेहबुब मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, शैलेश सुर्वे, समीर पवार, शशिकांत दरेकर, जाकीर मणियार, नितीन मुंढे, महेश कदम, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात आणि नितीन बाबर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.





