Pune : वारकऱ्यांना प्रथमोपचारापासून आयसीयुपर्यंतची सुविधा

पुणे : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात आणि एकूणच वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून, त्यांना संपूर्ण पालखी मार्गावर सर्दी खोकल्यासारख्या प्राथमिक उपचारापासून अतिदक्षता विभागातील अत्यावश्यक उपचार पुरविण्याचे सूक्ष्म आणि व्यापक नियोजन केले आहे. वारी मार्गावर विशेषज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी असे मिळून १,३०३ आरोग्यविषयक मनुष्यबळ सेवा देणार आहे.
दरवर्षी वारी दरम्यान १५ लाखांहून अधिक वारकऱ्यांना प्राथमिक आणि अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरवण्यात येतात. यंदा त्यामध्ये आणखी नवीन सेवांचा समावेश केला आहे. त्यामध्ये २९० आरोग्यदूत, १५ स्त्रीरोगतज्ज्ञ, मुक्कामाच्या ३७ ठिकाणी हिरकणी कक्ष, दिंडीप्रमुखांसाठी साडेतीन हजार औषधांचे किट, अत्यवस्थ रुग्णांसाठी ४५ अतिदक्षता कक्ष आणि प्रत्येक किमीवर आपला दवाखाना असे यंदाच्या वारीचे नियोजन आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता
प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी किमान १० खाटांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू कक्ष / ट्रॉमा केअर सेंटर) असणार आहेत. पुणे, सासवड, लोणंद, तरडगाव आणि पंढरपूर येथे एकूण २५ आयसीयू कक्ष सक्रिय असून, त्यात अत्यवस्थ रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन यंत्रणा, भूलतज्ज्ञ, अस्थीव्यंगतज्ज्ञ, सज्ज ठेवण्यात आले आहेत.
पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण
वारी मार्गावरील पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण केले आहे. मार्गावरील खासगी रुग्णालयांना दहा टक्के खाटा आरक्षित करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी आणि अन्नसुरक्षासाठी हॉटेल, उपाहारगृह, धाबे याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. कोरडा दिवस, धूर फवारणी, स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
तज्ज्ञ डॉक्टर – १३८
एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी – १४९
बीएएमएस, समुदाय आरोग्य अधिकारी – २२८
परिचारिका – ४३७
औषध निर्माण अधिकारी – १०
सफाईगार – १४८
आशा सेविका – १४५
तंत्रज्ञ – १८
एकूण – १,३०३
वारकऱ्यांना संपूर्ण प्रकारची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिकांची सेवा २४ तास तैनात करण्यात येत आहे. दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना स्थापन करण्यात आला असून, अशा २०२ दवाखान्यांत मोफत प्राथमिक उपचार, औषधे व समुपदेशन उपलब्ध करून दिले आहे.
– डॉ. राधाकिशन पवार, आरोग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ





