पुणे : पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम गतीने पूर्णत्वास येत असताना दुसऱ्या बाजूला द्रुतगती महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला आहे. त्यानुसार द्रुतगती महामार्ग सहा पदरीऐवजी आठपदरी करण्यात येणार आहे. सुमारे 70 किलोमीटर लांबीच्या आठ पदरीकरणासाठी 100 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यासाठीचा प्रस्ताव मात्र शासन स्तरावर प्रलंबित आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढणार आहे. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरून दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. द्रुतगती महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये- जा करतात. सद्यस्थितीत द्रुतगती महामार्ग सहापदरी आहे. महामार्गावर वाहनांची वाढती वर्दळ आणि आता अपुरा पडणारा मार्ग यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने तयार केला आहे. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग हा सुमारे 94 किलोमीटर लांबीचा आहे. आता महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे असून, या दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, तर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या दरी पुलाचे काम वेगाने सुरू आहे. खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत आठ पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे उर्से टोल नाक्यापासून पुढे द्रुतगती महामार्ग आठपदरी करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्ग सलग आठपदरी होऊन प्रवास विनाअडथळा वेगाने होणार आहे. सद्यस्थितीत याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.