पुणे – अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणानिमित्त रामायणावरील दुर्मीळ लिथोग्राफ व पोस्ट कार्ड, हस्तलिखित तसेच, संस्कृतमधील रामायण, पेटिंग आदी एकाच प्रदर्शनातून पाहण्याचा दुर्मीळ योग पुणेकरांना प्रथमच लाभला आहे. पीएनजी सन्सने (पु. ना. गाडगीळ आणि सन्स) आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत रामायण आणि दुर्मीळ लिथोग्राफवर विशेष प्रदर्शन भरविले आहे. याचे उद्घाटन हिंदवी स्वराज्य महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व सीए रणजीत नातू यांच्या हस्ते झाले. या वेळी पीएनजी सन्सचे संस्थापक अजित गाडगीळ, विक्रीप्रमुख विवेक जोशी, महेश विसपुते, ओंकार भिडे आदी उपस्थित होते.
पुण्यात हॅपी कॉलनी (कोथरूड), सातारा रोड (वाळवेकर नगरजवळ) पीएनजी सन्सच्या दालनात भरविले आहे. हे प्रदर्शन २८ जानेवारीपर्यंत साप्ताहिक सुट्टी वगळून सकाळी अकरा ते रात्री साडेआठपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले आहे. तसेच, औंधमधील वेस्टंड सेंटर वनमधील दालनात विविध चित्रकारांनी रामायणावर काढलेल्या पेंटिंगचे प्रदर्शन २८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
पीएनजी सन्सचे आणि झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाचे संस्थापक अजित गाडगीळ यांच्या कलासंग्रहात रवि वर्मा प्रेस व अन्य लिथोग्राफ प्रेसचे रामायणावरील लिथोग्राफ, पोस्ट कार्ड, शिल्प आदी आहेत. रामायणावरील संपूर्ण लिथोग्राफ राम मंदिरानिमित्त सर्वांना पाहण्यासाठी प्रथम उपलब्ध केले आहेत.
यात पायसदान, श्रीराम जन्म, मारुती-श्रीराम भेट, भरत, त्राटिका वध, श्रीराम-रावण युद्ध, अयोध्या, राज्याभिषेक आदी रामायणात वर्णन असलेल्या प्रमुख प्रसंगांचे लिथोग्राफ आहेत. तसेच, विविध शैलीतील श्रीरामांची चित्रे, हस्तलिखित रामायणाची मुद्रित प्रत, संपूर्ण रामायणावर औंध संस्थानाचे पंत प्रतिनिधी बाळासाहेब पंत यांची ५० पोस्ट कार्ड चित्रे आदी पाहता येणार आहेत. महान चित्रकार राजा रवि वर्मा, म. वि. धुरंधर, बी. पी. बॅनर्जी, वासुदेव पांड्या, जी. वेंकटेश राव आदींनी रामायणावर चित्रे काढली होती. त्या पैकी बहुतेक चित्रांचे लिथोग्राफ रवि वर्मा प्रेसने छापले होते.
राम मंदिराच्या निमित्ताने रामायणावर आधारित हे प्रदर्शन पाहायला मिळणे, ही सर्वांसाठी एक पर्वणीच आहे. पीएनजी अँड सन्सने ती उपलब्ध करून दिल्याचा आनंद आहे, असे नातू यांनी नमूद केले. अधिकाधिक लोकांनी ते पाहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
पीएनजी सन्सने श्रीरामांची नाणी, राम मंदिर सोने व चांदीत आणि अन्य धातूंमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.
रामायणावरील लाइव्ह पेंटिंगचा डेमो
अनेक वेळा आपण चित्र पूर्ण झालेले पाहतो, या वेळी रामायणावर आधारित चित्र काढताना पाहण्याची संधीदेखील राम मंदिर लोकर्पणाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. २१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील पीएनजी सन्सच्या दालनात पेटिंगचा डेमो होणार आहे. आर्टिस्ट श्रृती कुलकर्णी, जयश्री जेजुरीकर व शिवानी महाजन रामायण आधारित विषयांवर चित्र काढणार आहेत.