पुणे: विद्यमान, आयाराम चर्चेत; कार्यकर्ते मात्र चिंतेत

तीन सदस्यीय प्रभाग रचना, आरक्षणासह महाविकास आघाडीचा मुद्दा
पुणे – महापालिकेची निवडणूक यंदा तीन सदस्य प्रभाग रचनेत होणार आहे. त्यातच, नुकतीच जाहीर झालेली प्रभाग रचना पाहता अनेक नगरसेवकांना आपला प्रभाग सोडून इतर प्रभागात लढावे लगणार आहे. तर महापालिका हद्दीत नव्याने आलेल्या 23 गावांसह ही प्रभाग रचना जाहीर झालेली असली तरी या गावांना विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग जोडले गेल्याने सर्वच राजकीय पक्षांतून तिकिटासाठी अनेकांचे “इनकमिंग-आउटगोईंग’ होणार आहे. त्यामुळे, या प्रभाग रचनेवर विद्यमान तसेच पक्षाला “सोडचिठ्ठी’ देत इतर पक्षात “घरोबा’ करण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांकडून तिकिट निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते मात्र चिंतेत पडले आहेत.
महाविकास आघाडी झाल्यास शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार असून भाजपला विद्यमान नगरसेवकांना प्रभाग देण्यासह, रिपाईला जागा देणे तसेच इतर पक्षातून येणाऱ्या “आयारामांना’ तिकिट देण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
महापालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अंतर्गत प्रारूप प्रभाग रचना जाहीर होऊन आता लवकरच हरकतींची सुनावणी आहे. मात्र, त्याच वेळी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छूकांची कोंडी झाली आहे. या निवडणूका तीन सदस्यांच्या प्रभागात होणार असून सुमारे 58 प्रभाग असणार आहेत. यात तीनचे 57 तर दोन सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे.
सध्या, महापालिकेत चार सदस्यांचा एक प्रभाग आहे. त्यामुळे शहरात अनेक प्रभागात राष्ट्रवादीचे तसेच भाजपचे चारही नगरसेवक आहेत, त्यामुळे अशा प्रभागात दोन्ही पक्षांना विद्यमान नगरसेवकांना तिकिटे देताना कसरत करावी लागणार आहे. तर, ज्या उमेदवारास तिकिट मिळणार नाही ते उमेदवार इतर पक्षांचा “झेंडा’ हातात घेण्यासाठी तयार आहेत.
उमेदवारी देताना…
तीन सदस्यांचा प्रभाग, आरक्षण यानुसार सर्वच प्रमुख पक्षांकडून आधी विद्यमान नगरसेवक, त्यानंतर आयाराम तर त्यानंतर मागील निवडणूकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. परिणामी, पक्षाकडून या निवडणूकीत तिकिट मिळेल अशी अपेक्षा ठेवलेले अनेक कार्यकर्ते चिंतेत असून या कार्यकर्त्यांचा नाराजीचा फटका निवडणूकीत सर्वच पक्षांना बसू शकतो.





