Pune : पुणे कृषी महाविद्यालयात प्रदर्शन

पुणे : पुण्याच्या कृषी महाविद्यालयामार्फत ६ ते १० मार्च या कालावधीत महाविद्यालयाच्या परिसरात फुले कृषी-२०२५ शाश्वत शेतीवर आधारीत आधुनिक शेती प्रात्याक्षिके आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेतीबद्दल जागृती निर्माण करणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रवृत्त करणे आणि शेतकरी, शास्त्रज्ञ सरकारी संस्था आणि उद्योजकांमध्ये सहकार्यास चालना देणे यासाठी प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
शाश्वत शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जैविक कृषी पद्धती, मातीच्या आरोग्य आरोग्य व्यवस्थापन आणि रासायनिक तणनाशक आणि किटकनाशकांचा वापर करण्याच्या पद्धती यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात शेतीशी संबंधीत अनेक उत्पादने विक्रीला ठेवली जाणार आहेत. सर्व शेतकरी, सामान्य नागरिक, शेतीशी संबंधीत कंपन्या, कृषी जैविक निविष्ठा उत्पादक आणि पुरवठादार, धोरण निर्माते आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.





