पुणे : मार्केट यार्डातील फळे – भाजीपाला विभागात दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी!

पुणे – मार्केट यार्डातील फळ-भाजीपाला विभागातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. बाजारात दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. केवळ शेतीमाल घेऊन आलेल्या वाहनांनाच आता बाजारात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून मार्केट यार्डात तरकारी, गुळ-भुसार विभागात शेतमाल चोर्यांसह, तोडफोडीच्या घटना घडत आहेत. भरास भर म्हणजे वाहतुक कोंडीही कमी होत नव्हती. या पार्श्वभूमीवर सुरक्षा एजन्सी तीन वेळा बदलूनही सकारात्मक परिणाम झाला नाही. या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, संचालक अनिरूध्द ऊर्फ बाप्पू भोसले, सुदर्शन चौधरी यांच्यासह विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रशासनाने वाहतुक कोंडी रोखण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे.
सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते १२ या वेळेत दुचाकी बाजारात सोडण्यात येत होत्या. त्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वाहतुक कोंडी रोखण्यास मदत होणार का, हे येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे.



