Pune : अतिक्रमण विभाग झाला जागा

पुणे : शहरात गल्लीबोळ तसेच मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असताना महापालिकेचा अतिक्रमण काहीच कारवाई करीत नव्हता. याबाबत नागरिकांनी थेट आयुक्तांकडे व्यथा मांडल्याने खडबडून जागे झालेल्या अतिक्रमण विभागाने शहराच्या वर्दळीच्या रस्त्यांवर अतिक्रमण कारवाई करीत तब्बल २० ट्रक पेक्षा अधिक साहित्य जप्त केले.
अनेक रस्त्यांवरील हाॅटेलचालक तसेच व्यावसायिकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्यात आली. फर्गुसन रस्ता, सिंहगड रस्त्यालगतची गंगा भाग्योदय सोसायटीच्या समोरील चौपाटी, झेन्साॅर आयटी पार्कचा परिसर तसेच कात्रज प्राणीसंग्रहालयाच्या बाहेर असलेल्या चौपाटीचा समावेश आहे. या कारवाईत सुमारे २० ते २२ हजार चौरस फूटांचे अतिक्रमणही पाड्ण्यात आले. अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभागाकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली.
शहरात मागील दोन ते महिन्यांपासून महापालिकेची अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र होते. परिणामी, महापालिकेची कारवाई थंडावल्याने अनेक ठिकाणी अनधिकृत व्यावसाय सुरू झाले होते. दुकानदारांकडून पदपथ थेट पथारी व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्यात आले.
अनेक हाॅटेल व्यावसायिकांकडून टेरेस तसेच साइड मार्जिन तसेच फ्रंट मार्जिंनमध्ये अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. ही बांधकामेही काढण्यात आले असून रस्त्यांवर ठेवण्यात आलेले साहित्यही महापालिकेने जप्त केले आहे. पालिकेकडून फर्गुसन रस्त्यावर असलेल्या हाॅटेल गुडलक, वैशाली, तिरंगा, शिरोळे ब्लाॅक तसेच हल्दीरामच्या दुकानाच्या बाहेरील अतिक्रमणे काढल्याचे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख संदीप खलाटे यांनी सांगितले.





