पुणे – पुण्यात जून महिन्यात जी 20 परिषद होणार याची कल्पना महापालिकेस तीन महिने आधीच होती. तसेच महिनाभर आधीच महापालिकेच्या कामाचे नियोजन ठरलेले असतानाही; परिषद सुरू होण्याच्या काही दिवस आधी महापालिकेकडून शहरात उड्डाणपूल तसेच वेगवेगळ्या भागात विद्युत रोषणाईच्या निविदा काढल्या. मात्र, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे सांगत, प्रशासनाने निविदा उघडण्याआधीच एका ठराविक ठेकेदारास दर निश्चित करून शहरात विद्युत रोषणाईची कामे करून घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे, आधी वेळ असताना निविदा नेमक्या कोणासाठी उशिरा काढण्यात आल्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात जून महिन्यात दोन टप्प्यात जी 20 परिषद होणार आहे. त्यासाठी विद्युत विभागाकडून मेट्रो पिलर, रस्ते व काही चौकांमध्ये रंगीबिरंगी प्रकाशझोत सोडण्याच्या निविदा काढण्यात आल्या. विद्युत विभागाने शनिवारी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मेट्रो पिलरवर रंगीत प्रकाशझोत सोडण्यासाठीची निविदा काढली आहे. सोमवार (दि.12) पासून ही परिषद सुरू होणार असताना शनिवारी (दि.10) रोजी निविदा काढण्यात आली. तर त्याला सात दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात हे काम रविवारी (दि.11) रोजी निविदा उघडून ठेकेदार निश्चित होण्याआधीच करण्यात आले. जी 20 साठी अनेक कामांच्या निविदा राबविण्यात आल्या आहेत. परंतू वरिष्ठांच्या सूचनेनुसार ऐनवेळी रोषणाईच्या कामामध्ये बदल करावा लागला आहे. आजपासून (दि.12 जून) जी 20 परिषद सुरू होत असल्याने युद्धपातळीवर ही कामे करून घेण्यासाठी एस्टीमेट रेटपेक्षा कमी दराने ठेकेदाराला ही कामे दिली आहेत. – श्रीनीवास कंदूल,मुख्य अभियंता, विद्युत विभाग