Pune : रिक्षावर झाड कोसळल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

पुणे : शहरात बुधवारी (दि.२८) दुपारी झालेल्या मुसळधार पावसात झाड कोसळल्याने रिक्षात प्रवास करणाऱ्या ७६ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देर्वी घटना पेशवे पार्क उद्यानाजवळ घडली. यात रिक्षाचालक जखमी झाला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुभदा यशवंत सप्रे (वय ७६, रा. सिंहगड रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. रिक्षाचालक संजय अवचरे हे जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की. ना. सी. फडके चौकातून सिंहगड रस्त्याच्या दिशेने निघालेली रिक्षा पेशवे पार्क उद्यानाजवळ पोहोचताच अचानक उद्यानातील एक जुने गुलमोहराचे झाड मोडून रस्त्यावर कोसळले. या झाडाचा मोठा फांदीचा भाग थेट रिक्षावर पडला. अपघात इतका भीषण होता की रिक्षाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. त्यात रिक्षाचालक आणि महिला प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली. शुभदा सप्रे यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रिक्षाचालक संजय अवचरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जबाबदारी कोण घेणार?
या घटनेनंतर पुन्हा एकदा महापालिकेच्या वृक्ष छाटणी आणि देखभाल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पावसाळ्यापूर्वी झाडांची तपासणी, छाटणी व नाजूक झाडांची विल्हेवाट लावणे आवश्यक असते. मात्र, वेळेवर उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.




