Pune : ई-पिंक रिक्षा नोंदणीला सुरुवात

पुणे – राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ई-पिंक रिक्षा नोंदणीला पुण्यात सुरवात झाली आहे. गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना राबविली असून, पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरातील जवळपास तीन हजार ४०० महिलांना ई-पिंक रिक्षा देण्यात येणार आहे. त्यापैकी पुणे शहरात दोन हजार ८०० महिलांना या रिक्षा देण्यात येणार आहे.
राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून गरजू महिलांना स्वावलंबी करण्यासाठी ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य योजना सुरू केली. या योजनेद्वारे महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी ९० टक्के कर्ज आणि दहा टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना गरजू, घटस्फोटित, विधवा, एकल महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वबळावर रोजगार मिळवून देण्याचा सरकारचा उद्देश आहे. राज्य सरकार ई-रिक्षा किमतीच्या २० टक्के अनुदान देईल आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून ७० टक्के कर्ज मिळेल. त्यानुसार पुणे आरटीओ मार्फत ई-पिंक रिक्षा लाभार्थीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ई-पिंक रिक्षा लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी याच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये परिवहन अधिकारी, महिला बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय व इतर असे सहा सदस्य असणार आहेत.
लाभार्थी निवड पात्रता
– महाराष्ट्र राज्यात रहिवासी असावा
– वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान
– वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक
– कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असावे
– अनुसूचित जाती/जमाती/इतर मागासवर्गीय/विधवा/एकल महिला/अपंग महिला यांना प्राधान्य.
‘ई-पिंक रिक्षाच्या लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार पुण्यातील महिलांनी त्यांची नोंदणी करावी.’
– स्वप्निल भोसले – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.





