PUNE: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी ५ जानेवारीला सुनावणी

पुणे – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदारांची नावे असलेली यादी सादर केली. न्यायालयाने या साक्षीदारांना समन्स काढले असून, पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या गेल्या सुनावणी दरम्यान सीबीआयने जे पुरावे सादर केले ते खोटे असल्याचे आरोपींनी न्यायालयात सांगितले होते. त्यावेळी शरद कळसकर, संजीव पुनाळेकर यांनी लेखी म्हणणे सादर केले होते. तर, डॉ. तावडे यांनी सीबीआयचे अधिकार्यांना साक्ष देण्यासाठी बोलवण्याची मागणी केली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीच्या वेळी साक्षीदारांची यादी सादर करण्याचा आदेश बचाव पक्षाला दिला होता.
त्यानुसार दि. १९ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान बचाव पक्षातर्फे दोन नावांचा समावेश असलेली यादी सादर केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारी रोजी होणार आहे. या प्रकरणात सीबीआयने आत्तापर्यंत २० साक्षीदार सादर केले असून, त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींना ३०० पेक्षा जास्त प्रश्न विचारले होते. त्यावेळी आरोपींनी बहुतांश प्रश्नांना माहिती नाही, अशी उत्तर दिले होते.





