Pune : गुणवंत विद्यार्थ्यांच्या अर्थसाहाय्यात दुप्पटीने वाढ करा

पुणे : महापालिकेतर्फे गेल्या १५ वर्षांपासून इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्यात कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. आता मात्र विद्यार्थ्यांचा वाढता शैक्षणिक खर्च विचारात घेऊन त्यांच्या अर्थसाहाय्यात दुप्पटीने वाढ करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. याबाबत विविध संघटनांनी महापालिकेकडे आग्रह धरला आहे.
इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद योजनेअंतर्गत १५ हजार रुपये तर बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत २५ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. या योजना सुरू झाल्यापासून आजतागायत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या पंधरा वर्षांत महापालिकेच्या उत्पन्नात चार-पाचपटीने वाढ झालेली आहे. उच्च शिक्षणाच्या शुल्कामध्येदेखील या कालावधीत अनेकपटीने वाढ झालेली आहे.
पुण्यातील युवकांच्या रोजगारात वाढ करण्यासाठी या युवकांना नोकरी व्यवसायाभिमुख असे अत्याधुनिक कुशल शिक्षण घेण्यासाठी महापालिकेने जास्तीत जास्त अर्थसाहाय्य करणे आवश्यक आहे. याबाबत महाराष्ट्र नागरी कृती समिती अध्यक्ष सुरेश जैन, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, पुणे शहर काँग्रेस संघटक सचिव अभिजित महामुनी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले आहे.





