PUNE: कापलेला हात जोडण्यात डाॅक्टरांना यश; सह्याद्री हाॅस्पिटलमध्ये सलग सहा तास शस्त्रक्रिया

पुणे – अपघातात तरुणाचा हात कापला गेला. त्याची प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये प्लॅस्टिक व कॉस्मेटिक शल्यचिकित्सक डॉ. सुमित सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली डाॅक्टरांच्या टीमला हे यश आले.
दिवे घाटात ट्रक आणि दुचाकीत झालेल्या अपघातात, दुचाकीवरीक तरूण रमेश (नाव बदलले आहे) याचा उजव्या बाजूचा हाताचा वरचा भाग कापला गेला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉ. सुमित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया सुरू झाली. डाॅ. सक्सेना म्हणाले, अशा क्लिष्ट शस्त्रक्रियांमध्ये वेळ महत्त्वाची असते. शरीरातील रक्तवाहिन्या, नसा, स्नायू, स्नायूबंध आणि हाडे यांच्यासह सर्व महत्त्वाच्या संरचना सहा तासांच्या आत ठीक केल्या. त्यातही मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होती.
यामध्ये मोठ्या प्रमाणात विच्छेदन करावे लागणार असल्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होता. रुग्णास रिपरफ्यूजन जखमेची (रिपरफ्यूजन इन्ज्युरी-आर आय हे एका अत्यंत गंभीर शारीरिक परिस्थितीचे वैद्यकीय नाव आहे) शक्यता असल्याने शस्त्रक्रियेनंतरही बारीक लक्ष ठेवणे आवश्यक होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अस्थी रोगतज्ज्ञ डॉ. तापडिया, अॅनेस्थेटिस्ट डॉ. रूपा अब्राहम, डॉ. इनायत, सहायक डॉ. मनीष, रुग्णपरिचारक धर्मेंद्र, प्रियंका यासह कर्मचारी यांनी सहकार्य केले.





