Pune Divorce News : फक्त दीड महिन्यात ताटातूट अन् पहिल्या तारखेलाच उच्चशिक्षित दांपत्याचा घटस्फोट; न्यायालयाचा झटपट निर्णय

Pune Divorce News : वैचारिक मतभेदामुळे लग्नानंतर दीड महिन्यातच वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दांपत्याचा घटस्फोट पहिल्या तारखेलाच झाला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एम.व्ही.भाटीया यांनी हा निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे प्रदीर्घ कालावधीपासून वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे सुमारे सव्वा वर्षे वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
माधव (वय ३४) आणि माधवी (वय २९) (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ॲड. अमर गुजर, ॲड. सुचित मुंदडा यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तो व्यावसायिक आहे. तर ती गृहिणी आहे. एप्रिल २०२४ मध्ये दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसातच दोघात वाद हो ऊ लागले. वाद इतके विकोपाला गेले की, २ जून २०२४ दोघे वेगळे राहू लागले.
घरच्यांनी समजावायचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेण्यात आला. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज केला. तो मंजुर झाला. निकालानुसार त्याने तिला एकरक्कमी पोटगी दिली. मात्र, दोघात स्त्रीधन, इतर दागदागिने, पैसे आणि संसार उपयोगी साहित्यावरून कोणतेही वाद नाहीत.
“वैचारिक मतभेदामुळे दोघे सव्वा वर्षांपासून वेगळे राहत होते. दोघे आता एकत्र येणे शक्य नव्हते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.”
– ॲड. सुचित मुंदडा, अर्जदारांचे वकील.

