PUNE: पुणे सायबर पोलीस ठाण्याचे विभाजन; पोलीस आयुक्तांचा निर्णय

पुणे – सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर मुख्यालयातील सायबर पोलीस ठाण्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायबर गुन्हे दाखल करणे, तसेच तपासासाठी पोलीस ठाण्यातील कामकाजात आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने सायबर पोलीस ठाण्याच्या कामकाजात बदल करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
सध्या प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सायबरच्या तक्रारी घेण्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक नेमण्यात आला आहे. मात्र, पुरेसे प्रशिक्षण नसल्याने त्यांच्याकडून टोलवाटोलवी केली जाते. तसेच गुन्ह्याचा तपासही योग्य प्रकारे होत नाही.पुणे पोलीस दलात पूर्व आणि पश्चिम असे दोन विभाग असून पाच परिमंडळ आहेत. पूर्व विभागात चार आणि पाच परिमंडळांचा समावेश असून, पश्चिम विभागात परिमंडळ एक, दोन, तीनचा समावेश होता. सायबर पोलीस ठाण्यातील कामकाजाच्या पद्धतीत पूर्व आणि पश्चिम असे दोन विभाग करण्यात येणार आहेत.
परिमंडळनिहाय दाखल होणारे सायबर गुन्हे संबंधित विभागाकडे सोपविण्यात येणार आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या कामकाजात विभाजन करताना सायबर गुन्हे दाखल करणे, तसेच तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.
पुणे, मुंबई, ठाण्यात वाढते गुन्हे
मुंबई, ठाणे, पुणे शहरात सायबर गुन्हेविषयक तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. पुणे शहरात सायबर चोरट्यांकडून केल्या जाणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढते आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही आणखी दोन सायबर पोलीस ठाणी सुरू करण्यासाठी गृहविभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, अद्याप सायबर पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. सायबर गुन्हे तसेच तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मुंबईत सहा स्वतंत्र सायबर पोलीस ठाणी आहेत. मुंबईतील लोकसंख्या विचारात घेऊन तेथे अन्य शहरांच्या तुलनेत सायबर पोलीस ठाण्यांची संख्या वाढवण्यात आली आहेत.





