पुणे जिल्हा : येळकोट येळकोट जय मल्हार

जेजुरीच्या खंडेरायाचा षड्:रात्रोत्सव उत्साहात : सोहळ्यत पाच लाख भाविकांनी श्रींच्या चरणी लीन
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा षड्:रात्रोत्सव (चंपाषष्ठी) मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला. सोमवारी (दि. 18) विधिवत पूजा-तळीभंडार, दिवटी पाजळवून कांद्याची पात, वांग्याचे भरीत, बाजरीच्या पिठाचा रोडगा, पुरणपोळीचा नैवेद्य देवांना अर्पण करीत सोहळ्याची सांगता झाली. सहा दिवस चालणार्या या उत्सवात सुमारे पाच लाख भाविकांनी गडावर दाखल होत. खंडेरायाचे दर्शन घेतले.
सहा दिवसांच्या उत्सवकाळात भाविकांना महाप्रसादाची सुविधा उपलब्ध करून देणार्या जय मल्हार चंपाषष्ठी अन्नदान सेवा प्रतिष्ठान, पुजारी सेवेकरी वर्गाच्या वतीने सोमवारी (दि. 18) बाजरीची भाकरी वांग्याची भाजी, कांद्याची पात व मिष्ठान महाप्रसादाची सुविधा दिली. गडकोटातून रविवारी (दि.17)सायंकाळी घडशी समाज बांधवांच्या सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात देवांच्या तेलहंड्याची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील चावडीवर समस्त ग्रामस्थ, मानकरी यांच्या वतीने तेलहंड्याचे पूजन व मान देण्यात आला. त्यानंतर तेलहंडा पुन्हा गडावर दाखल होत देवांच्या तेलवण-हळदीचा विधी करण्यात आला.
पहाटेची नित्याची पूजा-अभिषेक भूपाळी आरती झाल्यानंतर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बालद्वारीतील घट उठविण्यात येऊन उत्सवमूर्ती मुख्य गाभार्यात नेण्यात आल्या. विधिवत नैवेद्य अर्पण करीत सोहळ्याची सांगता झाली. बहुजन वर्गात या उत्सवाला विशेष महत्त्व असल्याने ग्रामस्थ, मानकरी यांच्या मानाच्या पूजा सांगता सोहळ्याचे दिवशी होत असतात. परंपरेनुसार ग्रामस्थांनीही आपल्या देवघरातील देवांना नैवेद्य अर्पण करीत तळीभांडार केला व दिवटी पाजळवून खंडेरायांची आरती करीत जयघोष केला.
अशी आहे आख्यायिक
कुलदैवत खंडेरायाचा अवतार दिन हा चंपाषष्ठीचा दिवस मानला जातो. मार्गशीर्ष शुद्ध 1 या दिवशी शिवशंकरानी मार्तंड भैरवाचा (खंडेराया) अवतार धारण केला व सहा दिवस युद्ध करून मणी आणि मल्ल दैत्यांचा संहार केला, (म्हणून या दिवसांना षड्:रात्रोत्सव म्हणतात). त्यानंतर देव जेजुरी गडावर प्रकट झाले, ऋषी मुनी देवगणांनी देवांवर भंडार्याची उधळण करीत त्यांना रत्नजडित दिपीकेने (दिवटी) ओवाळले आणि विजयाचा उत्सव साजरा केला, अशी आख्यायिका आहे.
तळीभंडार करीत देवांचा जयघोष
गेली शेकडो वर्षांपासून जेजुरी गड व पंचक्रोशीमध्ये विशेषतः खंडेरायाच्या सर्वच स्थानावर चंपाषष्ठी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो, यामध्ये कोटमा पूजन, दिवटी पेटवून खंडेरायाला ओवळणे, तळीभंडार करीत देवांचा जयघोष करणे, पुरणपोळी, वांग्याचे भरीत, कांद्याची पात, बाजरीच्या पिठाचा रोडगा हा नैवेद्य अर्पण करणे आदी धार्मिक विधी महत्त्वाचे असतात.





