पुणे जिल्हा : सहकार महर्षि कारखान्याच्या 1 लाख 1 हजार 111 व्या साखर पोत्याचे पूजन

अकलूज – शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25च्या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या 1 लाख 1 हजार 111 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. सहकार महर्षी कारखान्याचा सिझन 2024-2025 चा ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून, आजअखेर 1 लाख 24 हजार 860 मे. टन ऊसाचे गाळप होऊन 1 लाख 06 हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले. सरासरी साखर उतारा 9.35 टक्के व आजचा साखर उतारा 9.40 टक्के आहे.
सध्या प्रति दिवस 8,500 मे. टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत आहे. चालू सिझन मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प 7 नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून आजअखेर 1 कोटी 09 लाख 45 हजार 090 युनीट वीज निर्माण झाली. त्यामधून 66 लाख 46 हजार 214 युनिट वीज विक्री केलेली आहे. तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये दि. 28 नोव्हेंबरअखेर 18 लाख 94 हजार 219 लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच 16 लाख 78 हजार 454 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
साखर पोती पूजनाचे कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक, सतीश शेंडगे-पाटील, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद,, महादेव क्षिरसागर, तज्ञ संचालक, अॅड. प्रकाशराव पाटील, तसेच सेक्रेटरी अभयसिंह माने-देशमुख व खातेप्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. साखर पोतीपूजन प्रसंगी कारखान्याचे चेअरमन. जयसिंह मोहिते-पाटील यांचे स्वागत चिफ केमिस्ट एस. एन. जाधव व सत्कार चिफ इंजिनिअर एस. के. गोडसे यांनी केला.





