पुणे जिल्हा : वारकऱ्यांना सुविधा चांगल्या मिळणार

इंदापुरात पालखी आढावा बैठकीत भरणेंची माहिती
इंदापूर – चालू वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या अधिक होणार आहे. पाऊस पडल्यामुळे चार-आठ दिवसांमध्ये आपल्या शेताची पेरणी करून भक्तीभावाने वारकरी, पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, संत सोपान काका महाराज पालखी सोहळा, तसेच संतराज महाराज पालखी सोहळा, संत निळोबाराय पालखी सोहळ्यामध्ये असणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे इंदापूर तालुक्यात चांगले स्वागत करून त्यांना चांगल्या सेवा सुविधा देऊन सर्व वारकऱ्यांची सेवा तालुक्यातील प्रशासन, नागरिक, समाजसेवी संस्थांनी करावे, असे आवाहन माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्याची पालखी आढावा बैठक तसेच टंचाई आढावा समन्वयक बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दि.15) रोजी इंदापूर शासकीय विश्रामगृहात सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता भोसले, पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता कुपल यांच्यासह वीज वितरण कंपनी, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा आढावा मांडला.
भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सेवा द्या. त्यामुळे तो वारकरी इंदापूर तालुक्याचे चांगले नाव घेईल. त्या अधिकाऱ्याचे नाव घेईल, असे काम करा. पालखी नियोजनात कुठेही कसर करू नका, अशा सूचना आमदार भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. इंदापूर नगरपालिकेसह तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने काळजीपूर्वक वारकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न यशस्वी करावा. आपल्या घरचा सोहळा आहे.असे नियोजन करा.
मुक्कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी थांबावे
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्यात जेथे मुक्काम आहे तेथे अधिकाऱ्यांनी थांबले पाहिजे. सात तारखेला सणसर येथे संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आहे. आठ तारखेला अंथुर्णे, नऊ तारखेला निमगाव केतकी, दहा तारखेला इंदापूरला व अकरा रोजी सराटीला पालखीचा मुक्काम होणार आहे. बेलवाडी व इंदापूर येथे गोलरिंगण होणार आहे. सोपान काका पालखी सोहळा लासुर्णे, निरवांगी येथे मुक्कामी असणार आहे. वारकऱ्यांना रस्ते, पाणी, औषध कुठेही कमी पडू देऊ नका, अशाही सूचना आमदार भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.





