Pune District : निवडणुका जुन्याच गटांवर की नवीन प्रभागरचनेनुसार?

उरुळी कांचन : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने, या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट जनतेतून निवडून येण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे जुन्याच गटांवर निवडणूक होणार की नवीन प्रभागरचनेनुसार निवडणूक होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हवेली तालुक्यातील 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा मोठा फटका हवेली तालुक्याला बसला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही किती गटात होणार याचे गणित महायुती सरकारवरच अवलंबून आहे. त्यामुळे महायुतीचे व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जुन्या गटानुसार अंदाज बांधून नवीन गट रचनेनुसार आपले ‘स्थानिक‘चे राजकीय फासे फेकताना दिसत आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार, जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गण वाढणार का कमी होणार याची चर्चा अद्याप सुरु आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 2022 पूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसार या निवडणुका घ्याव्या, असे आदेश देत सध्या सुरू असलेल्या याचिकांवर जो काही निकाल येईल, तो निर्वाचित सर्व सदस्यांना लागू राहील, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर मार्च 2022 पासून प्रशासक राजवट सुरू आहे. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. तसेच पंचायत समित्यांचा कारभारही प्रशासकाकडे असून कामकाज गटविकास अधिकारी पाहत आहेत.
जुन्या व नव्या गटानुसार फासे
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेसाठी 82 गट तर, पंचायत समित्यांसाठी एकूण 164 गण निश्चित केले होते. यामुळे जिल्हा परिषदेचे नवीन 7 गट आणि पंचायत समित्यांचे नवीन 14 गण वाढले होते. हवेली तालुक्यातील तब्बल 7 गट आणि 14 गणांवर संक्रांत आली होती. नवीन रचनेत हवेली तालुक्यात आता केवळ 6 गट आणि 12 गण निश्चित झाले होते.
प्रस्थापितांना बसणार धक्का !
अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या असून प्रशासकराज आहे. त्यामुळे त्या-त्या मतदारसंघातील अगोदर असलेल्या पदाधिकार्यांचे राजकीय वजन कमी झाले. संपर्क न ठेवल्याने तेथील राजकीय समीकरणे देखील बदलून गेल्यामुळे प्रस्थापितांना पुन्हा नव्याने तेथे जम बसविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
निवडणुकांत सर्वच पक्षांचा लागणार कस
2022 मध्ये शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात जसे आमूलाग्र बदल झालेत. तसेच जिल्ह्यात, तालुक्यात देखील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटांत विभागणी होऊन कार्यकर्ते विभागले गेले. अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने समीकरणे तर बदललीच सोबतच प्रत्येक पक्षाची मतपेढी देखील बदललेली असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा या निवडणुकीत राजकीय कस लागणार आहे.





