पुणे जिल्हा : पवारांवर विश्वास ठेवणार्यांना शेवटपर्यंत मदत करणार

हर्षवर्धन पाटील : रिपाइंचे पुणे जिल्हा सरचिटणीस कडवळे पवार गटात
इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात सर्व जाती धर्माच्या लोकांचा प्रवेश झाला आहे. सगळ्या समाजाला सर्व घटकांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये विकासकामाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतले जाईल. ज्यांनी ज्यांनी पवारांवर विश्वास ठेवला,त्यांना शेवटपर्यंत मदत करण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण स्वीकारणार आहे, अशी ग्वाही माजी सहकारमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सरचिटणीस संदिपान कडवळे व इंदापूर शहरातील नागरीक यांचा संत सावतामाळी मंदिर सभागृहा येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 12) पक्षप्रवेश झाला त्यावेळी ते बोलत होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीमधून कडवळे पवार गटात आले आहेत.
2004ची माजी विधानसभेची निवडणूक ही इंदापूर विधानसभेची जागा रामदास आठवले यांना सुटलेली होती. मला त्यावेळेस खासदार रामदास आठवले यांनी बोलवून घेतले आणि सांगितले तुम्ही या भागातील नेते आहात,म्हणून मी माझा उमेदवार उभा करणार नाही. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ही जागा मी तुमच्याकडे सुपूर्द करतो. यावेळी आठवले साहेबांनी पाठिंबा दिला म्हणून निवडून आलो आणि सलग चार टर्म या तालुक्याची सेवा केली. यामध्ये आठवले यांचे श्रेय आहे हे नाकारू शकणार नाही.असा खुलासा उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केला.
समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आलोय
समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहे. माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही.आम्ही तन-मन-धनाने, तुतारी वाजवणारा माणूस चिन्हावर मतदान घडवण्याचे काम करणार आहोत. याची पावती आम्हाला आगामी काळात मिळावी, अपेक्षा युवक नेते संदीपान कडवळे यांनी व्यक्त केली.





