Pune District: पाडळी डोंगरावर लागला वणवा

लेण्याद्री : जुन्नर- माणिकडोह मार्गावरील आयटीआय समोरच्या डोंगरावर सोमवारी (दि. 3) सायंकाळी 8 च्या सुमारास अचानक वणवा लागला. या डोंगरावर असलेला तीव्र उतार, सोसाट्याचा वारा आणि आगीची व्याप्ती पाहता आग आटोक्यात आणणे कठीण होते. वनविभागाचे सुमारे 10 कर्मचारी आणि काही युवक मिळून हा वणवा मध्यरात्री 2.30 च्या सुमारास आटोक्यात आणला.
दरम्यान ही आग काही युवकांच्या टोळक्याने लावल्याची चर्चा परिसरात होती.याबाबत वनविभागाने दुजारा दिला नसून या आगीत सुमारे 30 हेक्टर डोंगरावरील वन्यसंपदा जळून खाक झाली. सोबतच परिसरात वास्तव्य असलेल्या जंगली प्राण्यांना या वणाव्याचा फटका बसला आहे. या परिसरात बिबट्या, तरस, मोर, ससे व सरपटणारे विविध वन्यजीव आदींचा वावर आहे.
दरम्यान ही आग विझवताना ब्लोअर मशीनचा वापर करण्यात आला, मात्र डोंगर उतारावरील आग आटोक्यात आणण्यासाठी अडचणी येत होत्या, अशी माहिती वनपाल नितीन विधाटे यांनी दिली.
आग लावणारे मोकाटच..
जुन्नर तालुक्यातील विविध डोंगरांवर व सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये वणवा नेहमीच लागत असतो. अनेकदा हा वनवा मुद्दामहून लावला जात असल्याचे गावकरी सांगतात. डोंगरावरील वाळलेले गवत जाळल्यानंतर पावसाळ्यानंतर चांगला चारा जनावरांना उपलब्ध होत असल्याचे काहींचे म्हणणे असते. तर काही युवक दारूच्या नशेत आग लावत असल्याचे अनेकजण सांगतात. वनकायद्यामध्ये या साठी तुरुंगवासाची शिक्षा असली तरी आत्ता पर्यंत आग लावणार्या व्यक्तीला शिक्षा झाल्याचा इतिहास नाही.





