Pune District : सासूसह पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

उरुळी कांचन : घरगुती वादातून चिडलेल्या जावयाने सासू व पत्नीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत सासूच्या हाताला मोठी जखम झाली असून या हल्ल्यात पत्नीही जखमी झाली आहे. सोमवारी (दि. 21) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आंब्याच्या मळा परिसरात ही घटना घडली.
प्रमोद बाळासाहेब आंबले (रा. टेकवडी, ता. पुरंदर) असे कोयत्याने हल्ला करणार्या जावयाचे नाव आहे. तर संगिता मच्छिंद्र महाडीक (वय 55, रा. आंब्याचा मळा, शिंदवणे, ता. हवेली) असे वार झालेल्या सासूचे नाव आहे. तर प्रियांका प्रमोद आमले (वय 32) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियांका आमले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती प्रमोद आंबले याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रियंका आंबले सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आपल्या आईसोबत घरी असताना त्या ब्लाऊज शिवण्यासाठी बाहेर निघाल्या होत्या. यावेळी त्यांचे पती प्रमोद आंबले हा अचानक घरासमोर आला. त्यांनी प्रियंका यांच्यावरील पिशवी व मोबाईल हिसकावून फेकून दिला. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत जवळच्या कोयत्याने प्रियंका यांच्यावर हल्ला केला. डोक्याजवळ, मान आणि खांद्यावर कोयत्याचे वार करत त्यांना गंभीर जखम केली.
दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या प्रियंका यांच्या आई संगीता महाडिक यांच्यावरही प्रमोदने कोयत्याने हल्ला केला. त्यांच्या डाव्या हातावर खोल जखम झाली आहे. शेजारी सतीश काळे यांनी मदतीस धाव घेतली असता, त्यांनाही आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच प्रियंका यांच्या कुटुंबीयांनाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.





