पुणे जिल्हा : गणेश बाप्पा कोणाला पावणार

सोरतापवाडी : येणार्या विधानसभा निवडणुकीत गणेश बाप्पा आमदारकीच्या रुपाने कुणाला पावणार? याची चर्चा शिरूर-हवेलीतील गावात रंगू लागली आहे. नुकत्याच झालेल्या गणेश उत्सवामध्ये विद्यमान आमदार अशोक पवार, तसेच आमदरकीचे इच्छुक उमेदवार माऊली कटके यांनी गावोगावी जाऊन आरती करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे गणेश बाप्पा आमदारकी रुपी कुणाला आशीर्वाद देणार हे आता लवकरच निवडणूक झाल्यानंतरच कळेल.
येणारी विधानसभा निवडणुक अटीतटीची होणार असल्याचे दिसून येत आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अशोक पवार यांनी भाजपचे बाबुराव पाचर्णे यांचा पराभव केला होता. प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी सोडून कमळ हातात घेतले. तसेच भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे भाजप कोणाला तिकीट देणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रदीप कंद व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका जयश्री पलांडे हे दोघे भाजपकडून इच्छुक असून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माऊली कटके हे दंड ठोकून उभे राहणार आहेत. तर विद्यमान आमदार अशोक पवार यांची राष्ट्रवादी शरद पवारचंद्र गट यांच्याकडून जवळजवळ उमेदवारी निश्चित झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अशोक पवार यांनी शरदचंद्र पवार गटातच राहणे पसंत केले. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांचा अशोक पवार यांनी हिरीरीने प्रचार करून कोल्हे यांना निवडून आणले.
लोकसभेच्या निवडणुकीत सहा आमदारांपैकी पाच आमदार हे शिवाजीराव आढळराव पाटील (अजित पवार गट) यांचा प्रचार करत होते. तर आमदार अशोक पवार (शरदचंद्र पवार गट)हे एकमेव आमदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाजूने प्रचार करत होते. शिरूर विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना 1,27,687 एवढी मते मिळाली तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना 1,00,031 एवढी मते मिळाली 27656 मतांची आघाडी अशोक पवार यांनी शिरूर-विधानसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना दिली. त्याची परतफेड अमोल कोल्हे करणार का व अशोक पवार यांना निवडून आणणार का याची चर्चा शिरूर हवेलीत रंगू लागली आहे. अजित पवार गटाने अजून तरी आपला उमेदवार पुढे आणला नसून अजित पवार गट कुणाला तिकीट देणार का ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या केलेल्यांना तिकीट देणार याची उत्कंठा शिरूर हवेलीतील नागरिकांना लागली आहे.
माऊली कटके शिवसेनेकडून उभे राहतात की अपक्ष, याची चर्चा सर्वत्र चालू आहे. आमदार अशोक पवार व माऊली कटके यांनी पूर्व हवेलीतील अनेक गावात गणेश बाप्पाची आरती केली. तसेच संपूर्ण गावातील आरती खूप उशिरापर्यंत चालत असल्यामुळे नागरिकांच्या भेटीगाठी घेत एक प्रकारचा प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे. मग गणेश बाप्पा कुणाला आशीर्वाद देतात याकडे येणार्या विधानसभेच्या निवडणुकीनंतरच कळेल.
तिरंगी लढतीची शक्यता
शिरूर विधानसभा मतदारसंघाची आजची परिस्थिती पाहता तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अशोक पवार निवडणूक लढणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. माऊली कटके यांनी अभि नही तो कभी नही हा नारा देऊन निवडणूकीची तयारी केली आहे. तर भाजपकडून प्रदीप कंद किंवा जयश्री ताई पलांडे उमेदवार असू शकतात अशी नागरिकांच्यात चर्चा आहे.
त्यामध्ये आमदार अशोक पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांनी प्रचारास जोरदार सुरुवात केली असून प्रदीप कंद हे स्वतःजाऊन प्रचार करत आहेत. तर जयश्री पलांडे या गावोगावी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यावरून शिरूर विधानसभा मतदारसंघाचे वातावरण आक्टोंबर हिट प्रमाणे तापू लागले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रतीक्षेत असून जो उमेदवार महायुती देईल त्याचा आम्ही हिरीरीने प्रचार करणार.
-दिलीप वाल्हेकर, हवेली तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस





