Pune District : अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई कधी?

चाकण : भामा आसखेड बिगर सिंचन आरक्षण असलेले धरण असून या धरणातून पुणे मनपा, चाकण, पिंपरी चिंचवडसह 19 गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजना सुरू आहेत; परंतु त्या लगत असलेल्या अनधिकृत रिसॉर्टचे सांडपाणी धरणात सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, सध्या तरी या रिसॉर्टवर कारवाईची टांगती तलवार असून कारवाई कधी होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यु शेलार यांनी सांगितले.
भामा आसखेड धरण क्षेत्रासाठी गट नंबर 59, 61, 62 मधील 5 हे 38 क्षेत्र संपादित केलेले असून पुणे महानगरपालिकेने जॅकवेलसाठी 23 आर क्षेत्र खरेदी केलेले आहे. तसेच याच गटनंबर मधील 5 हेक्टर 3 आर क्षेत्रामध्ये इलेगंट वॉटर फ्रंट रिसॉर्ट हे सुरू असून त्यासाठी आवश्यक असणार्या परवानगी न घेता हे रिसॉर्ट सुरू करण्यात आले आहे. रिसॉर्ट मालकाने धरण क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून धरणाच्या पुढील क्षेत्रात दगड माती मुरुमाचा भराव करून रिसॉर्टचा विस्तार केला आहे.
संबंधित रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामामुळे धरणाला धोका निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी भामा आसखेड धरण क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून बेकायदा सुरू असलेले इलेगंट वॉटर फ्रंट रिसॉर्टवर कारवाई करण्याबाबत संबंधितांना आदेशित करावे, अशी तक्रार दाखल करण्यात आलेली असून त्यावर कारवाई करणेबाबतचे पत्र दि.3 एप्रिल 2025 रोजी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी उपजिल्हाधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहायक अभियंता भामाआसखेड, करंजविहिरे, तहसीलदार खेड यांना दिलेले असून त्यानुसार वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने स्थळ पाहणी करून स्वयं स्पष्ट अभिप्रायाने अहवाल विनाविलंब सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनधिकृत हेलिपॅड, बोटिंग
भामा आसखेड धरण हे फक्त पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असताना त्यामध्ये रिसॉर्टचे सांडपाणी सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास हानी पोहचत आहे. तसेच याच रिसॉर्टमध्ये अनधिकृत हेलिपॅड असून धरणांमध्ये अनधिकृत बोटिंग सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग अथवा आवश्यक परवानगी घेतली गेलेली नाही.
शेवटपर्यंत पाठपुरवा करणार
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दि. 17 मार्च 25 रोजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या तक्रारीनुसार भामा आसखेड धरण क्षेत्रात बेकायदा रिसॉर्टवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यु शेलार यांनी सांगितले.





