Pune District : डाळिंब बागेत बहराला गहू

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील लहान शेतकरी आपले शेत्र कमी असल्यामुळे नवी शक्कल आंतर पिकाची राबवत आहेत. यामध्ये फळबागेत गहू, हरभरा, कांदा अशी अनेक पिके यशस्वी घेत कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळवण्याचा यशस्वी प्रयोग शेतकरी करताना दिसत आहे. असाच डाळिंब बागेत गहू आंतरपीक घेऊन उत्पन्न उत्पादन घेण्याचा प्रयत्न युवा शेतकरी श्याम इनामे यांनी केला आहे.
श्याम इनामे म्हणाले की, अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या इंदापूर तालुक्यातील 22 गावांपैकी दुष्काळी गावांमध्ये काटी गावचा समावेश होतो. मात्र येथील शेतकरी मेहनती कष्टाळू असल्यामुळे कमी पाण्यावर फळबागा पिकवतो आहे. यामध्ये आंतरपीक घेतो आहे. आम्ही सव्वाएकर शेतीत डाळिंबाची बाग एक वर्षापूर्वी लावलेली असून यामध्ये आंतरपीक म्हणून गहू या पिकाचा पेरा केला. फळबागांना विविध औषधे व खते याची मात्रा सातत्याने असल्यामुळे आंतरपीक जोमात येते. याचाच फायदा गहू पिकाला झाला आहे.
आंतरपीक घेणारा परिसर
काटी, वरकुटे, निमगाव केतकी या भागात जे छोटे शेतकरी आहेत. ते कमी शेतीत जास्त पिके कमी कालावधीत घेत आहेत. त्यामुळे काटी परिसर हा आंतरपीक घेणारा परिसर म्हणून नावारूपाला येत आहे. असे असले तरी आंतरपीक घेताना भरपूर मेहनत शेतकर्यांना घ्यावी लागते. फळबागांना कोठेही त्रास न देता, मोडतोड न होता, आंतरपीक काढणे तसेच जोपासणी करावी लागते, असेही इनामे यांनी नमूद केले.





