पुणे जिल्हा : आम्ही म्हणू तेच खरे असे चालणार नाही

आमदार बेनकेंनी नारायणाव ग्रामपंचायत पदाधिकार्यांना सुनावले
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगावचा विकास करावयाचा असेल तर आपण सर्वांनी हातात हात घालून पुढे गेले पाहिजे. येथून पुढच्या काळात आम्ही म्हणू तेच खरे असे चालणार नाही, अशा स्पष्ट शब्दात आमदार अतुल बेनके यांनी नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व पदाधिकार्यांना सुनावले आहे.
मुख्य बाजारपेठ रस्ता पुणे-नाशिक महामार्ग ते शनिवार बाजारतळ या सिमेंट काँक्रीटीकरण व रस्त्याचे रुंदीकरण कामासंदर्भात गुरुवारी (दि. 1) ग्रामस्थ व व्यापारी वर्गाची बैठक घेतली. त्यावेळी आमदार बेनके बोलत होते. तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने नारायणगावचा विकास करताना नारायणगाव ग्रामपंचायत सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले.
गावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करीत असून आमदार गावासाठी काही करीत नाही असे चुकीचे चित्र जाणीवपूर्वक रंगविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याचे रुंदीकरण होत असताना पक्के बांधकाम पाडण्यात येणार नसून पुढील दोन महिने अडचणी सहन कराव्या लागतील.
त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार बेनके यांनी केले. यावेळी आमदार बेनके यांनी व्यापारी व ग्रामस्थांच्या रस्त्याच्या कामाबाबत अडीअडचणी जाणून घेतल्या. बैठकीला व्यापारी, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, रोहिदास केदारी, शशिकांत वाजगे, डी. के. भुजबळ, रामदास अभंग, सागर दरंदळे, ग्रामस्थ उपस्थित होते.
आडमुठेपणाची भूमिका चालणार नाही.
गावच्या विकासासाठी निधी देण्याची भूमिका माझी असताना ग्रामपंचायतकडून सहकार्य झालेले नाही. त्यामुळे येथून पुढे गावातील विकासकामांची यादी सर्वांसमोर मांडून माझी भूमिका स्पष्ट करील. त्यासाठी ग्रामपंचायतची आडमुठेपणाची भूमिका चालणार नाही. जनतेला वेठीस धरून दडपशाही खाली काम करू नका. एक दिलाने चर्चा करून विकासाची कामे केली पाहिजे, असे आमदार बेनके यांनी नमूद केले.
असा होणार काँक्रिट रस्ता
बस स्थानकापासून नाशिक-पुणे महामार्ग ते वेशीपर्यंत रस्ता खोदून 180 मिटर लांबीच्या 10 मीटर रुंदी असलेल्या रस्त्याचे कोंबले स्टोनसह 13 मीटरचे रुंदीकरण. त्यापुढे 430 मिटर लांबीच्या साडेपाच मीटर रुंदीचा असलेला रस्ता सात मीटर रुंदीचा करणार.त्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूने 1.20 मीटरचे बंदिस्त गटार. त्यापुढे 120 मिटर लांबीचा ब्रह्मकुमारी विद्यालयापासून खैरे हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता 12 मीटरचा तयार होणार असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने 1.20 मीटर रुंदीचे बंदिस्त गटार. खैरे हॉस्पिटल पासून पुढे 240 मीटर लांबीच्या काँक्रीट रस्त्याची रुंदी 10 मीटर करणार व कब्रस्तानकडे जाणार्या रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवणार. पुलाचे रुंदीकरण आठ मीटरवरून बारा मीटर करण्यात येणार आहे.





