Pune District : शेतकर्यांना सर्वोतोपरी मदत मिळवून देऊ

दौंड : आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची प्रशासनासोबत बुधवारी (दि. 28) पाहणी केली आहे. यावेळी शेतकर्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई करण्यासाठी व मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी पत्रकारपरिषदेत दिले.
दौंड शहर व तालुक्यात नुकसान झालेल्या ठिकाणी भेटी देवून आमदार कुल यांनी माहिती घेतली आहे. मे महिन्यात 350 मिलीमीटर एवढा तीव्र पाऊस झाला आहे. त्यामुळे घरे, शेती, रस्ते, पोल्ट्री, कांदा, चाळ, जनावरांचा चारा, मुरघास आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकर्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी व्यक्तीगत नुकसान आहे, त्या ठिकाणी व्यक्तिगत मदत करण्यासाठी आग्रही भूमिका मांडणार असल्याचे आमदार कुल यांनी सांगितले.
आपत्तीमध्ये अडचणीच्या ठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात आली आहे. स्थलांतरित लोकांना प्रशासन व स्थानिकांच्या सहकार्याने मदत करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. ताराबाई आहिर या महिलेचा भिंत पडून मृत्यू झालेला आहे. हातवळण येथे पोल्ट्रीचे जवळपास एक कोटीचे नुकसान झाले आहे. गार येथे पोल्ट्रीचे नुकसान झाले आहे या ठिकाणी भेटी देण्यात आले आहेत.
नगरपालिकेच्या अधिकार्यांना नैराश्य
शहरातील प्रश्नांबाबत नगरपालिकेचे अधिकारी यांचे नैराश्य आहे. दौंड नगरपालिकेला या आठवड्यात मुख्याधिकारी यांची नियुक्ती होईल तसेच उपविभागीय अधिकारी यांची आठवडाभरात नियुक्ती होईल तसेच गटविकास अधिकारी यांचीही लवकरच नियुक्ती होईल अशी माहिती आमदार कुल यांनी दिली.





