पुणे जिल्हा : वडापुरी येथील पाणीपुरवठा कर्मचारी करणार 26 जानेवारीला उपोषण

13 महिन्यांपासून पगाराविना सोडतोय गावाला पाणी
वडापुरी – येथील ग्रामपंचायतीकडे गेल्या आठ वर्षांपासून पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कामाला असलेले नारायण प्रभाकर पवार यांनी गेल्या 13 महिन्यांपासून पगार मिळाला नाही. म्हणून 26 जानेवारी रोजी इंदापूर पंचायत समिती समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मी वडापुरी गावचा कायम रहिवासी असून गेल्या आठ वर्षांपासून या ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून काम करत आहे. मागील सहा वर्षांत माझा पगार वेळेत होत होता; परंतु दोन वर्षात वर्षाला एक किंवा दोन पगार दिले जातात आणि बाकीच्या पगाराला वसुली नाही असे कारण दिले जाते.
माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायत कर वसुली महिन्याला 25 ते 30 हजार रुपये होते तसेच मी इतर कामगारांच्या संपामध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या संपामध्ये कधीही सहभागी झालो नाही. ग्रामपंचायतच्या कामात कधीही खंड पडून दिलेला नाही. गावातील नागरिकांना मी पाणीपुरवठ्याची सेवा देत आहे;
परंतु माझे मासिक वेतन मागील 13 महिन्यांपासून मिळाले नाही तसेच जिल्हा परिषदेच्या विषयाचे वेतन मिळण्यासाठी ग्रामपंचायतकडून माहिती एआरपी लॉगिनमधून भरायचे असते ती न भरल्यामुळे माझे जिल्हा परिषदेकडून येणारे वेतनही बंद झालेले आहे.
त्यामुळे माझ्याबरोबर माझ्या परिवाराची उपासमारीची वेळ आली आहे तरी आपल्या स्तरावरून वेतन मिळावे असे निवेदनात गटविकास अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मला पगार मिळाला नाही तर 26 जानेवारी रोजी उपोषणास बसणार आहे.
मी दिलेल्या निवेदनानंतर गटविकास अधिकारी सो यांनी मला 26 जानेवारी रोजी करणारे अमरण उपोषण स्थगिती करावे असे सांगितले आहे परंतु मला हे मान्य नसून मी जोपर्यंत मला पगार मिळत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषणाला बसणारच असे सांगितले आहे.
-नारायण पवार, पाणीपुरवठा कर्मचारी





