Pune District : दौंड तालुक्याच्या जलसंपदा योजनांना गती

आमदार कुल यांचा पाठपुरावा – मंत्री विखे पाटील यांची सकारात्मक आश्वासने
पारगाव : पावसाळी अधिवेशन 2025 दरम्यान आमदार अॅड. राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील जलसंपदाशी संबंधित विविध समस्या व मागण्या सभागृहात ठामपणे मांडत ठोस पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रभावी भूमिकेमुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत महत्त्वपूर्ण आश्वासने दिली आहेत.
दौंड तालुक्यातील 3300 हेक्टर पाझर क्षेत्राचे निर्मूलन करण्यासाठी पाझर चर व बंदिस्त पाझर चर योजना तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी करताना आमदार कुल यांनी संबंधित प्रस्ताव वित्त विभागाकडे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले. यासोबतच कालवा लाभक्षेत्राबाहेरील शेतकर्यांसाठी असलेली 20 टक्के लोकवर्गणीची अट रद्द करावी, अशी जोरदार मागणीही केली.
खडकवासला कालव्यापासून फुरसुंगीपर्यंत मंजूर बंदिस्त कालव्याचे काम त्वरीत सुरू करून तीन वर्षांत पूर्ण करावे, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर 438.48 कोटी निधीच्या कामाला गती द्यावी, तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी देऊन लवकरात लवकर काम सुरू करावे, अशीही मागणी आमदार कुल यांनी केली.
उजनी धरणाच्या बॅकवॉटरमधील बॅरेजेस व मुळा, मुठा, भीमा नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीच्या जीर्ण बंधार्यांचे स्वयंचलित बॅरेजेसमध्ये रूपांतर करावे, असेही सूचवण्यात आले. या निर्णयांमुळे दौंड तालुक्यातील शेतीला आवश्यक तो जलपुरवठा मिळणार असून, जलसंपदेतून ग्रामीण विकासाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सकारात्मक पावले
या सर्व मागण्यांवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना सांगितले की, पाझरचर योजनेसाठी प्रलंबित प्रस्तावास जुलै अखेर मंजुरी दिली जाईल. 20 टक्के लोकवर्गणीची अट रद्द केली जाईल. जनाई-शिरसाई योजनेच्या निविदा प्रक्रिया जुलै अखेरीस पूर्ण होतील. पुरंदर योजनेच्या अंदाजपत्रकांना मान्यता दिली जाईल. खडकवासला कालव्याचे काम पुढील तीन वर्षांत पूर्ण होईल. तसेच उजनी बॅकवॉटरमधील बॅरेजेस व जीर्ण बंधार्यांचे स्वयंचलित बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील.





