पुणे जिल्हा : कमेवाडीत विठ्ठलनामाची शाळा भरली

बालवारकरी पायी दिंडीत रमले
तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळा कमेवाडी शाळेत आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलनामाची शाळा भरली होती. बालवारकरी पंढरीच्या विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत भजनात दंग झाले होते.
कमेवाडी जिल्हा परिषद शाळा सामाजिक तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त असे उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा आषाढी वारीनिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या वतीने दिंडी सोहळा व पालखी सोहळा आयोजित केला होता. शाळेतील बालवारकऱ्यांनी पंढरीच्या विठोबाची, रूक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. कमेवाडी परिसरात पायी दिंडी काढत पालक व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामचा नामघोष करीत दिंडी पुढे चालत होती. ठीकठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने दिंडीचे उत्साहात स्वागत केले. विद्यार्थ्यांना बरोबर पालकांनीही दिंडीमध्ये भजनाच्या तालावर नाचत, फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. शाळेच्या उपक्रमाबद्दल परिसरातून मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन आदर्श शिक्षक मुख्याध्यापक बाळासाहेब रसाळ, सतीश ढेकणे, अंगणवाडी सेविका सुकन्या दराखे, मदतनीस कल्पना दरवडे यांनी केले होते. यावेळी शिवानी भुजबळ, बाबासाहेब भुजबळ, नितीन गुंड, विलास ढमढेरे, पोपट जगताप, राहुल भुजबळ, ज्ञानोबा भुजबळ, शेखर ढमढेरे, स्नेहल चव्हाण, अमोल भुजबळ, महिला, पालक उपस्थित होते.





