Pune District : खरीप हंगामासाठी विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध

मंचर : आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड मंचर यांच्या वतीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडेकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित पुणे यांच्याकडील दर्जेदार इंद्रायणी, समृद्धी, भोगावती भात बियाणे आणि जे एस 335, फुले किमया केडीएस 753 व फुले किमया केडीएस 726 सोयाबीन बियाणे विक्रीसाठी संघाच्या डिंभे, घोडेगाव व मंचर डेपो येथे उपलब्ध झालेले आहे.
बियाणे साठा मर्यादीत उपलब्ध असून सद्य परिस्थितीत पाऊस समाधानकारक झालेला असला तरी देखील कृषी खात्याचा सल्ला घेवूनच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा, संघामध्ये सर्व प्रकारची रासायनिक खते व मिश्रखत खते विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडेकर यांनी दिली.
आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या सहकार्याने खरेदी विक्री संघाने नव्यानेच पशुखाद्य खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलांसाठी व दूध उत्पादन व्यवसाय करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दर्जेदार पशुखाद्य योग्य व वाजवी किमती मध्ये खरेदी विक्री संघाने विक्रीसाठी घोडेगाव, मंचर, निरगुडसर, लोणी, धामणी, पारगाव व रांजणी येथे उपलब्ध केलेले आहे.
खरीप हंगामामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी फक्त युरीया खरेदीसाठी संघामध्ये न येता सर्व प्रकारची रासायनिक खते बी बियाणे संघातून खरेदी करावी, शेतकऱ्यांनी खरेदीची पक्की पावती घेणे गरजेचे आहे. खरेदी करण्यासाठी येताना सोबत आधार कार्ड घेऊन येणे गरजेचे आहे.असे आवाहन खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सोपानराव नवले यांनी केले आहे.





