Pune District: उरुळी कांचन ते स्वारगेट पीएमपीएमएलबस सुरू

उरुळी कांचन : मागील दोन वर्षापूर्वी उरुळी कांचन ते स्वारगेट पर्यंतची पीएमपीएमएलची बससेवा बंद पडली होती. त्यामुळे उरुळी कांचनसह परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणासाठी जाण्यासाठी अडचणींना सामना करावा लागता होता. ही बससेवा पूर्ववत सुरू व्हावी, अशी मागणी विद्यार्थी व प्रवासी संघटनेने केली होती. या मागणीचा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ही बस सेवा शुक्रवार (दि. 5) पासून नागरिकांच्या सेवेत दाखल झाली आहे.
उरुळी कांचन शहर हे पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथील कामगार वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने पुण्यात जातात. त्यामुळे नागरिकांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडे बससेवा सुरू करावी म्हणून मागणी केली होती. त्यानंतर पीएमपीएमएलने नागरिकांच्या सेवेसाठी बससेवा सुरु केली होती; मात्र करोना काळात ही बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र करोनाचा प्रादूर्भाव संपल्यानंतरही बससेवा सुरु झालीच नाही.
उरुळी कांचन व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार व नोकरदार वर्गाला पुण्याला कामाला थेट बस नव्हती. त्यामुळे त्यांना हडपसर येथे उतरून दुसरी बस पकडावी लागत होती. त्यामुळे प्रवास्यांना त्रास सहन करावा लागत होता. ही गैरसोय लक्षात घेता उरुळी कांचन प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व यशवंत कारखान्याचे संचालक संतोष कांचन यांच्याकडे स्वारगेट (सारसबाग) ते उरुळी कांचन पर्यंत बससेवा सुरु करावी. यासाठी निवेदन दिले होते.
संतोष कांचन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उरुळी कांचन ते स्वारगेटसह निगडी, वारजे, माळवाडी, भोसरी, हिंजवडी व कात्रज यादरम्यान बस सेवा सुरू करण्यात यावे. असे निवेदन दिले. या निवेदनाची अजित पवार यांनी त्वरित दखल घेतली व पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांना बससेवा सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर दीपा मुंडे यांनी उरुळी कांचन ते स्वारगेट पर्यंतच्या बससेवेला हिरवा कंदील दाखविला आहे.





