Pune District : कळंब गावच्या हद्दीत जादुटोण्याचा प्रकार

मंचर : कळंब (ता.आंबेगाव) येथे शेतात काळ्या रंगाच्या कापडी चार बाहुल्या व टाचण्या टोचलेली चार लिंब, अंगारा टाकलेला नारळ मिळून आला आहे. जादुटोणा कायद्यानुसार पती-पत्नीवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रसिका भालेराव (वय ४५) या व्यवसायानिमित्त बाणेर-पुणे येथे राहत असुन त्यांची कळंब (ता. आंबेगाव) येथे शेती आहे.
मंगळवार, दि. ८ रोजी त्यांची शेती असलेल्या दगडीमळा येथील शेतात फिर्यादी रसिका भालेराव यांची चुलत सासू प्रिया बिपिन भालेराव व चुलत सासरे बिपिन वामन भालेराव ( दोघे रा. कळंब तालुका आंबेगाव) यांनी फिर्यादी रसिका भालेराव यांच्या जमिनीचे गेटच्या बाजूने तुटलेल्या जाळीतून अनाधिकाराणे आत प्रवेश करून शेतात वेगवेगळ्या ठिकाणी चार काळे रंगाचे टाचण्या टोचलेल्या चार कापडी बाहुल्या व टाचण्या टोचलेली चार लिंब, नारळ व त्यावर काळे रंगाचा अंगारा असलेल्या वस्तू टाकल्या. त्यावेळीं शेतात असलेला शेतकामगार नितीन शेळके याने त्यांना तूम्ही शेतात का आले असे विचारले असता त्यांनी शेतमजुरासही दमदाटी केली आहे.
या बाबत प्रिया बिपिन भालेराव, बिपिन वामन भालेराव या पती-पत्नीवर जादूटोणा कायद्यांतर्गत मंचर पोलीस ठाण्यात शनिवार दि.२६ रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रागिणी कराळे पुढील तपास करत आहे.





