Pune District : कांद्यातून वीस शेळ्या मेंढ्यांना विषबाधा

शिक्रापूर : वाघाळे (ता. शिरुर) येथील एका मेंढपाळाच्या तब्बल वीस शेळ्या मेंढ्याना शेतातील कांदे खाल्ल्याने विषबाधा झाली. मात्र, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने अठरा शेळ्या मेंढ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
वाघाळे येथील प्रभाकर थोरात यांच्या शेळ्या मेंढ्या शेतात चरत असताना शेळ्या व मेंढ्यानी शेतामध्ये गंधक व काही पावडर मारून ठेवलेले कांदे खाल्ले त्यांनतर दुपारच्या सुमारास अचानक चक्क वीस शेळ्या मेंढ्या जमिनीवर लोळू लागल्याने शेळ्यांना कहीतरी झाल्याचे लक्षात येताच थोरात यांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली.
पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल येडे, डॉ. गोरक्ष सातकर यांनी घटनास्थळी धाव घेत सुजित शेलार, आदिनाथ काळे, प्रभाकर थोरात, दीपक कदम यांच्या मदतीने सर्व शेळ्या मेंढ्यांवर उपचार सुरु केले. मात्र, यावेळी दोन शेळ्या दगावल्या तर अठरा शेळ्या मेंढ्या वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आल्याने मेंढपाळाचे लाखोंचे होणारे नुकसान वाचले आहे.
दरम्यान, पावसाळ्यात हिरवा चारा उपलब्ध असतो. जनावरे चारत असरणा विषारी तणे व वनस्पती खातात त्यामुळे शक्यतो गाजर गवत, कॉंग्रेस गवत, रुचकी, घाणेरी, कन्हेरी, बेशरम, धोत्रा, गुंज, नीळफुली, एरंड, ज्वारीचे कोवळी फुटवे या माध्यमातून विषबाधा होण्याची शक्यता जास्त असल्याने पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल येडे व डॉ. गोरक्ष सातकर यांनी सांगितले.





