Pune District : तुकोबांचा पालखी सोहळा वरवंडमध्ये विसावला

भांडगावात विसावा : अवघा परिसर हरिनामात तल्लीन
वरवंड/ पाटस – पंढरपूरच्या विठोबाचे दर्शनासाठी निघालेला वैष्णवांचा मेळावा राम कृष्ण हरीच्या जयघोषाने टाळ – मृदंगाच्या गजरात तल्लीन होत जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी सोहळा दौंड तालुक्यातील यवत येथील मुक्काम आपटून पंधरा किलोमीटरचा पायी प्रवास करत पालखी सोहळा मुक्कामासाठी वरवंड येथे मंगळवार (दि.२४) संध्याकाळी सहाच्या सुमारास दाखल झाला आहे.
अखंड महाराष्ट्राचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी सोहळा यवत येथून सकाळी आठ वाजता टाळ मृदुंग, हरिनामाचा गजर या भक्तिमय वातावरणात वरवंडकडे प्रस्थान झाली. यावेळी सकाळचा नाष्टा, भांडगाव येथे दुपारचा विसावा व जेवण करीत पालखी सोहळा वरवंडकडे मार्गस्थ झाला. यावेळी भांडगाव, वखारी, चौफुला येथील भक्तांसाठी काही काळ पालखी दर्शनासाठी थांबविली होती. यावेळी भक्तांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. वखारी येथील ग्रामस्थांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. केडगाव चौफुला येथील कला केंद्रातील नृत्यांगना यांनी वारकऱ्यांच्या विरंगुळासाठी कला सादर केली. वरवंड येथे संध्याकाळी सहा वाजता जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी दाखल झाली.
यावेळी वरवंडचे सरपंच योगिता दिवेकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप आदी मान्यवरांनी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. ग्रामस्थांच्या वतीने पालखीची महाआरती करण्यात आली. वरवंड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पादुका मुक्कामासाठी व दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी यवत ते वरवंड मार्गावर तालुक्यातील अनेक भक्तांनी, संघटना, संस्था यांनी पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांची मोफत चहा, नाष्टा, जेवण, व इतर वस्तूंचे वाटप करत मनोभावे सेवा केली.
दौंड महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पथदिवे, मोबाइल चार्जिंगसाठी बोर्ड बसविण्यात आले होते. वरवंड स्थानिक ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी खासगी शौचालय उपलब्ध करुन दिली होती. पालखी मार्गावर, परिसरात ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वरवंड ग्रामपंचायतीतर्फे वारकऱ्यांच्या अंघोळीसाठी व शौचालयासाठी विशेष खबरदारी घेतली होती. पालखी सोहळ्यातील वैष्णवांच्या ट्रँकरच्या पाणी व्यवस्थासाठी ग्रामपंचायतच्या चार व खासगी चार विहिरींवर सोय केली होती.
दरम्यान, दौंड पोलिसांच्या नेतृत्वाखाली वरवंड परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. सोलापूर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने चालू ठेवली होती. आरोग्य केंद्राकडून चोवीस तास वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र उभारले होते. यावेळी वारकऱ्यांची मोफत तपासणी करून औषध वाटप केले जात होते. दौंड तालुक्यातील यवत व वरवंड येथील दोन मुक्काम आपटून बुधवार (दि.२५) रोटी घाटामार्गे पुढील मुक्कामासाठी बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीकडे मार्गस्थ होणार आहे.





