Pune District : बेट परिसरात हायटेक लागवडीकडे कल

ऊसाच्या रोपासाठी शेतकरी आग्रही
राहू – दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरात पावसाने सध्या उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची कामाची लगबग चालली आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस लागवड जोरात सुरू आहे. परंतु यंदा पारंपरिक ऊस लागवडीला फाटा देत शेतकरी साध्या उसाची रोप लागण करण्याकडे जास्त वळलेले दिसत आहेत.
यंदा मे महिन्यात अनपेक्षित जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे शेत लागवडी योग्य करण्याचा अंदाज चुकला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या लागवडी या पुढे ढकलल्या गेल्या आहेत. परंतु आता पाऊस जरा थांबल्याने शेतकऱ्यांना कशाही प्रकारे आडसाली लागवड करणे गरजेचे आहे.
अजूनही बेट परिसरात पन्नास टक्के लागवडी योग्य जमीन करता आली नाही. जी जमीन लागवडी योग्य आहे. त्यासाठी बेणे लागवड करणे अतिशय जिकिरीचे आहे. बेणे प्लॉटमध्ये नसलेला वापसा, जमीन ओली असल्यामुळे वाहतुकीची अडचण, बेणे लागवड केल्यानंतर जर जास्त प्रमाणात पैसा झाला तर त्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. तसेच बेणे उसाच्या वाढलेल्या किमती देखील कारणीभूत आहेत.
अलीकडे कारखान्यांनी देखील शेतकऱ्यांना रोप लागवड करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी मेळावे, ऊस तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल हा रोप लागवडीकडे आहे.





