Pune District : मतदानादिवशी आरोप- प्रत्यारोपाचा ट्रेलर

अजित पवार, चंद्रराव तावरे यांच्याकडून टीका टिप्पणी
बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या चुरशीच्या निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत आरोप – प्रत्यारोप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीपासूनच या निवडणुकीकडे विशेष दिले. चेअरमन पदाचा उमेदवार आपणच असल्याचे देखील जाहीर केले. अजित पवार यांनी जवळपास १५ सभा घेऊन निवडणुकीचे शिवार चांगलेच तापवले. मतदानादिवशी देखील अजित पवार माळेगाव परिसरात तळ ठोकून होते. ३७ गावांतील ६७ मतदान केंद्रावर जात त्यांनी आढावा घेतला.
अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे हे दिसून येत आहे. दुसरीकडे सहकार बचाव पॅनलचे ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे व रंजन तावरे ही गुरु- शिष्येच्या जोडीने देखील कारखान्याचे कार्यक्षेत्र प्रचाराच्या माध्यमातून दणाणून सोडले. त्यामुळे खुद्द अजित पवार यांना देखील माळेगावच्या शिवारात तळ ठोकून थांबावे लागले. मतदानाच्या दिवशी देखील एकमेकांवर सडकून टीका केली होती.
माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती तालुक्यातील महत्त्वाचा सहकारी साखर कारखाना आहे. गेली ३५ वर्षे आपण परिसरात कार्यरत आहोत. जवळपास सव्वालाख लोकांचा आर्थिक संबंध असणारी ही संस्था आहे. मीही निवडणुकीत उमेदवार आहे. एका विकास सोसायटीचा सभासद आहे. त्यामुळे चेअरमन होण्याचा अधिकार मलाही आहे, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेशी माझा संबंध नाही- ते सभासद ठरवतील
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री अकरा वाजता सुरू होती, अशी विचारणा अजित पवार यांना पत्रकारांनी केली त्यावर ते म्हणाले त्या बँकेचे माझा संबंध नाही. माझ्या मार्गदर्शनाखाली ती बँक नाही. दोन वर्षांपूर्वी मी राजीनामा दिला आहे. नीलकंठेश्वर पॅनलचा एकही सदस्य त्यावेळी तिथे उपस्थित नव्हता. पीडीसी बँकेबाबत बोलले जात आहे. मात्र त्यांच्या शरद संकुल येथून पतसंस्थेच्या माध्यमातून निवडणुकीचे काम सुरू आहे. हे बोलले जात नाही. याबाबत माझ्याकडे देखील त्यांच्याविषयी तक्रारी आल्या. स्कॉड पाठवा पण मी दुर्लक्ष केलं. नाहीतर त्यांच्याही संस्थेला शील ठोकले असते. असे अजित पवार यांनी टोला लगावला. पीडीसी बँकेबाबत सुप्रिया सुळे यांनी एसआयटीद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. असे म्हणत त्यांनी भाष्य करणे टाळले.
मी काय अजित पवार आहे काय?
चेअरमन पदाची उमेदवारी आधीच जाहीर करायला मी काय अजित पवार आहे काय, असा टोला ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी मतदानादिवशी अजित पवार यांना लगावला. आधीच चेअरमन पद जाहीर करणाऱ्यांचा शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. दबाव तंत्राचा वापर ही तर त्यांची नेहमीची स्टाईल असल्याची खरमरीत टीका चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावर केली. शासकीय कर्मचारी आशा वर्कर, शिक्षक – शिक्षिकांचा वापर मते मागण्यासाठी केला. ११ गावे जोडून कारखाना ताब्यात ठेवू पाहणाऱ्यांचा डाव आम्ही उधळून लावला. याबाबत त्यांना लेखी द्यावे लागले ही लाजिरवाणी घटना राज्यात पहिल्यांदाच घडली. मताला १० हजारांप्रमाणे ११ हजार मतदारांना पैसे वाटल्याची माहिती आम्हाला समजली आहे असा गौप्यस्फोट चंद्रराव तावरे यांनी केला.





