पुणे जिल्हा : कांबळवडीतील टोमॅटो उत्पादक लखपती

नीरा – परिंचे (ता. पुरंदर) जवळील कांबळवडी येथील शेतकऱ्यांना टोमॅटोने लखपती केल आहे. मागील चार वर्षांत या टोमॅटो उत्पादकांचा झालेला तोटा यावर्षी शेतकऱ्यांनी भरून काढला आहे. या वर्षी मागील चार वर्षात टोमॅटोला विक्रमी भाव मिळाला आहे. साधारण 2 ते 3 हजार रुपये असा भाव टोमॅटोच्या कॅरेटला मिळाला आहे. त्यामुळे पुरंदरमधील छोट्याशा कांबळवडीतील चार शेतकरी लखपती झाले आहेत. त्यांना आत्तापर्यंत एकरी 20 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.
कांबळवाडी येथील शेतकरी अरविंद काळभोर, ओंकार काळभोर यांनी मे मध्ये साधारण प्रत्येकी सव्वा एकरावर टोमॅटोची लागवड केली होती. अरविंद काळभोर यांना आतापर्यंत 17 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर यापुढे त्यांना आणखी तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. ओंकार काळभोर या तरुणाला देखील टोमॅटोने लखपती केले आहे.
विशेष म्हणजे मागील चार ते पाच वर्षांत त्याला याच पिकातून त्यांना मोठा तोटा झाला होता. पण यावेळेस त्याला चांगला फायदा झालाय. त्याला आत्तापर्यंत 20 लाख रुपयाचे उत्पन्न त्याला मिळाले आहे. यातून त्याचा मागील तोटा भरून निघाला आहे. त्याचबरोबर आणखी दोन शेतकऱ्यांनी देखील टोमॅटो मधून चांगले उत्पन्न मिळवलं आहे. त्यांनाही टोमॅटोने लखपती केले आहे.
“दरवर्षी शेतकरी टोमॅटो पिकवतो मात्र त्याला फायद्यापेक्षा तोट्याचा सामना करावा लागतो. सरकारनं टोमॅटो 50 रुपये पेक्षा जास्त किमतीने विकू नये, असा फतवा बाजार समितीला काढला पण ज्यावेळेस आम्हाला तोटा होतो त्यावेळेस हे सरकार कुठे जाते ? कवडीमोल भावाने आम्ही टोमॅटो विकले किंवा शेतात सडून घालवले तर मग त्याची जबाबदारी सरकार घेणार का?”- अरविंद काळभोर, टोमॅटो उत्पादक, कांबळवडी
शरद पवार आज शेतकऱ्यांच्या भेटीला
या शेतकऱ्यांनी नुकतीच माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना टोमॅटोचा वानवळा भेट दिला. यावेळी टोमॅटोमधून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती पवार यांना देण्यात आली यानंतर बुधवारी (दि. 24) शरद पवार हे या शेतकऱ्यांच्या शेतात जाणार आहेत. त्यांच्या शेताची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर कांबळवाडी येथील शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.





