पुणे जिल्हा : बारामती शहराचा कौल कोणाकडे झुकणार

बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघातील हायहोल्टेज लढत झाली आहे. बारामती शहराचे एकूण ८० हजार मतदार असून शहराचा कल कोणाच्या बाजूला असणार याची उत्सुकता बारामतीकरांना लागले आहे. शनिवार (दि.23) होणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे.
राज्यात विकासाचा पॅटर्न म्हणून बारामतीचे खऱ्या अर्थाने ओळख आहे. बारामती शहराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून प्रतिसाद प्रत्येक निवडणुकीत दिला आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली. त्यामुळे शहरात नक्की काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना ४८ हजार मताधिक्य मिळाले होते. त्यात शहरातून खासदार सुळे यांना मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील त्रुटी दूर करीत मोर्चेबांधणी केली होती. त्यात सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देत सूक्ष्म नियोजन केले होते. त्यामुळे बारामती शहरातील मतदार हे अजित पवार की युगेंद्र पवार यांच्या बाजूने कौल देणार, याची चर्चा रंगली आहे.
शहरामधून देखील सुप्रिया सुळे यांनाच मताधिक्य मिळाले होते. तीन वर्षात अजित पवार यांनी ९ हजार कोटी रुपयांची विकास कामे बारामती शहर व तालुक्यात आणली. असे असले तरी शहरवासीयांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांची साथ दिली. विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे आहे.
शहरातील जनता देखील अजित पवार यांनी केलेल्या विकासकामाला प्राधान्य देणार का, हा खरा प्रश्न आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात बारामती शहर, जिरायत पट्टा, बागायत पट्टा असे तीन विभाग पडतात. शहराच्या तुलनेत तालुक्याचे मतदान जास्त आहे. शहरातून कायमस्वरूपी अजित पवार यांना लीड मिळाले आहे. यंदा शहराचा कल कोणाच्या बाजूने ते दि. २३ तारखेला कळेल. मात्र, तोपर्यंत शहरवासीय आकडेमोड करण्यात व्यस्त आहेत.





