पुणे जिल्हा : मुगावरील पिवळा मोझॅकचे वेळीच नियंत्रण करा – कांतीलाल वीर

शिरूर (अरुणकुमार मोटे) – खरीप हंगामातील मुग पिकावर अल्प प्रमाणात पिवळा मोझॅक दिसुन येत असुन शेतकऱ्यांनी दुर्लक्ष न करता तात्काळ उपाययोजना कराव्यात असे आवाहन शिरुर मंडळ कृषी अधिकारी कांतीलाल वीर यांनी केले आहे.
निर्वी ता. शिरूर येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत मुग पिकाचे उत्पादन वाढीसाठी मुग प्रकल्प अंतर्गत पिक प्रात्यक्षिक घेण्यात आले. मुग पिक प्रात्यक्षिकामध्ये बीबीएफ म्हणजेच रूंद सरी वरंबा पध्दतीनेच पेरणी केली असुन बीज प्रक्रिया रायझोबियम व ट्रायकोडर्मा तसेच पीएसबी ची करण्यात आल्याने पिकाची उगवण व वाढ अतिशय चांगली दिसुन आली आहे.
शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असुन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, मंडळ कृषी अधिकारी कांतीलाल वीर कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे व कृषी सहायक जयवंत भगत यांनी वेळोवेळी प्रक्षेत्रास भेठी देऊन मार्गदर्शन करीत आहेत.
मंडळ कृषी अधिकारी कांतीलाल वीर, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे ,कृषी सहायक जयवंत भगत सुनिल नाइक यांनी रमेश पवार निर्वी यांच्या प्रक्षेत्रास भेठ दिली असता पिवळा मोझॅक ची दोन तीन झाडे दिसुन आली आहे. पिवळा मोझॅक या वर कसलाही उपाय नसुन त्याचा प्रसार होऊन नये म्हणुन पिवळी झाडे उपटून टाकणे तसेच रस शोषन करणाऱ्या किडी या पिवळा मोझॅकचा प्रसार करीत असल्याने त्यांचे नियंत्रण कामी डायमेथोएट 10 लिटर 20 मिली किंवा असिटामाप्रीड 10 लिटर 4 ग्रॅम किंवा थायोमेथोक्साम 10 लिटर 4 ग्रॅम किंवा डायफेंथियुरॉन 50% WP 10 लिटर 8 ते 10 ग्रॅम या प्रमाणात किटकनाशकाची फवारणी घ्यावी.
तसेच पिवळे चिकट सापळे लावावेत अशा स्वरूपाच्या उपाययोजना केल्या तर हा विषाणू वाढणार नाही व उत्पादनात घट होणार नसल्याचे कृषी सहायक जयवंत भगत यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी मुगाचे उत्पादन पिवळा मोझॅक मुळे घटु नये म्हणुन तात्काळ उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.





