Pune District : यंदा दिवे घाट एक आव्हान!

दिवे : दरवर्षीचा आषाढी पालखी सोहळा वारकरी आणि लाखो भाविकांसाठी अलौकिक असतो. तर नागमोडी वळणाच्या दिवे घाटातील सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक सकाळ पासूनच दिवे घाटातील संपूर्ण डोंगरावर बसून असतात. मात्र, यंदा दिवे घाटाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून बहुतेक घाट फोडलेला आहे. अशा अवस्थेत भाविकांना घाटात जाण्यापासून रोखण्याचे आणि घाटातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान राहणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय पालखी मार्गाचे काम अत्यंत युद्धपातळीवर सुरु आहे. हडपसर वरून पुरंदर तालुक्यात प्रवेश होत असताना लागणार्या दिवे घाटात रुंदीकरणाचे युद्धपातळीवर काम सुरू असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 22 जून रोजी दिवे घाटातून पुरंदर तालुक्यात आगमन होत आहे. दिवे घाटातील अवर्णनीय सोहळा याची देहू याची डोळा पाहण्यासाठी हजारो भाविक घाटातील डोंगरावर बसून असतात. कधी एकदा सोहळा येतोय आणि दर्शन मिळते अशी सर्वांची अवस्था झालेली असते.
घाटातून पालखी सोहळा येताना वारकर्यांना यंदा फारसा त्रास जाणवणार नाही कारण घाटाचे बर्यापैकी रुंदीकरण झाले असून रस्त्याच्या बाजूने बेरिकेटिंग करण्यात येत आहे. त्याचबरोबर घाटाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने बहुतेक घाट फोडण्यात आला आहे. घाट फोडल्याने अनेक ठिकाणी निसरडा झाला आहे. त्यामुळे संपूर्ण घाटातील डोंगरावर जाणे धोकादायक झाले आहे. मात्र, पालखी सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिक घाटात बसून असतात. त्यातच यंदा पावसाची दाट शक्यता असल्याने घाटाकडे जाणेही धोकादायक ठरणार आहे. अशा परिस्थितीत तिथे गर्दी वाढल्यास दरड कोसळण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे अशा ठिकाणी नागरिकांना जाऊ न देणे योग्य ठरणार आहे. मात्र भाविकांची संख्या लक्षात घेता एवढ्या गर्दीवर नियंत्रण कसे ठेवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॅरिकेटींग ठरणार सोयीस्कर
पुरंदरसह पुणे शहर आणि राज्याच्या विविध भागातील भाविक झेंडेवाडी परिसरात गाड्या पार्क करून दिवे घाटातील डोंगरावर प्रवेश करतात. त्यामुळे झेंडेवाडीपासून दिवेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा गाड्यांची गर्दी असल्याने वाहतूक कोंडी तर होतेच. त्याचबरोबर घाटात प्रचंड गर्दी होते. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून आताच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. घाटातील रस्त्यावर वारकर्यांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेटींग करतानाच घाटात ठराविक अंतरावर बॅरिकेटींग करून नागरिकांना तिथपर्यंत जाण्यापासून परावृत्त करणे सोयीस्कर ठरणार आहे.
दिवे घाटातील वारकर्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने सर्व खबरदारी घेतेलेली आहे. त्याचबरोबर घाट माथ्यावरील डोंगर रुंदीकरणासाठी फोडल्याने त्या परिसरात प्रवेश करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे यावर्षी घाटाच्या डोंगरावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात येतील. दिवे घाट सुरु होताना सासवड पोलिसांची हद्द असून पुढील सर्व घाट हवेली पोलिसांच्या हद्दीत येतो. त्यामुळे याबाबत वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास या गोष्टी आणून देण्यात येतील आणि जास्तीचा पोलीस बंदोबस्त मागवून समन्वयाने परिस्थिती हाताळण्यात येईल.
– ऋषिकेश अधिकारी, पोलीस निरीक्षक, सासवड.





