Pune District: …तर आम्हाला संभाजी महाराज व्हावे लागेल

दिवे : जमीन अधिग्रहण कायद्यात ज्या जमिनीचा उपयोग नाही. नापीक आहे, अशी जमीन घेतली जाते. यात केवळ १० हेक्टर नापीक, ८५ टक्के जमीन बागायत असताना शेतकऱ्यांची परवानगी न घेता जबरदस्तीने जमीन बळकावत आहात.
तुमच्यासाठी जमीन धंदा असेल पण आमच्यासाठी आई आहे. आमच्या जमिनी संपादन करायला तुमच्या बापाची आहे का, असा खडा सवाल करीत शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून येवून औरंजेबाची भूमिका कराल तर आम्हाला संभाजी महाराज व्हावे लागेल. असा निर्वाणीचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला आहे.
पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित कुंभारवळण गावच्या महिला अंजना कामथे यांचे शनिवारी (दि.४) निधन झाले. दानवे यांनी कुंभारवळण येथे त्यांच्या घरी जाऊन कामथे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सरकारवर तुफान हल्ला चढविला.
दानवे यांनी कोणत्याही नोटीस न देता आमच्या शेतात कशाला येता, असा प्रश्न उपस्थित केला आहे. भावनिक लढा लढू नका तर कायद्याची लढाई लढा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
हौस असेल तर बारामतीला विमानतळ करा
दानवे म्हणाले की, ज्या दलालांनी लोढा, अग्रवाल यांना जमीन दिल्याने मंत्रालयात बसून विमानतळाचे काम सुरू आहे. जमीन खरेदी करणारी टोळी असून पैसे घेऊन जमिनी खरेदी करायची आणि मंत्रालयात बसून प्रकल्प आणायचे. तुम्हाला फार हौस असेल तर बारामतीचा विमानतळ विस्तारित करा आणि त्याचा वापर करा, असे आव्हान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. पुरंदरला विमानाची गरज आहे. पुरंदरला विमानतळाची गरज नाही. तुम्हाला विमानतळ करायचे असेल तर बारामतीच्या विमानतळाचे विस्तारीकरण करा, अशा शब्दांत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.





