पुणे जिल्हा : साखरपुड्याच्या कार्यक्रमातून दागिन्यांसह पैशांची चोरी

मंचर : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) च्या हद्दीत यशोदीप मंगल कार्यालयात झालेल्या साखरपुडा आणि टीळ्याच्या कार्यक्रमातून अज्ञात चोरट्याने दागिने आणि पैसे असलेली पर्स असा एकूण ३ लाख ४ हजार ८८२ रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ही घटना बुधवारी (दि. ३) सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे. याबाबत गणेश संभाजी खालकर (रा. जवळे, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील यशोदीप मंगल कार्यालय येथे खालकर व हिंगे कुटुंबियांच्या मुला-मुलीचा साखरपुडा-टिळा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी खालकर कुटुंबीयांनी फिर्यादी यांच्या पत्नीने पर्समध्ये दागिने व पैसे आणले होते. पाहुण्यांच्या गडबडीत त्यांनी पर्स शेजारील खुर्चीवर ठेवले असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.
पर्समध्ये १ लाख ७ हजार रुपयांची रोख रक्कम, १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल, ३८ हजार ०४४ रुपयांची सोन्याची अंगठी, १ लाख ४२ हजार ८८४ रुपयांची सोन्याची चैन, १ हजार ९०० रुपयांचे चांदीचे अँकलेट असा ३ लाख ४ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार तान्हाजी हगवणे करत आहे.





