पुणे जिल्हा : शेतकरी जगाला पाहिजे – शिवाजी काळभोर

शेतकर्यांची बाजू न घेतल्यास यशवंत कारखाना निवडणुकीत पराभव अटळ
सोरतापवाडी : हवेली तालुक्यातील मांजरी उपबाजार हा शेतकर्यांसाठीच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तयार करण्यात आला आहे. मात्र येथे दुबार विक्रेते दोन ते तीन तासाच्या विक्रीतून मालामाल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी जगला पाहिजे, असे मत लोणी काळभोर येथील शेतकरी शिवाजी शहाजी काळभोर यांनी व्यक्त केले.
बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर या बाजारात गेल्या तीन महिन्यांपासून संचालक मंडळाने दुबार विक्री बंद केली आहे. त्यामुळे सर्व शेतकर्यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. दुबार विक्री बंद केल्यामुळे शेतकर्यांना बाजारात माल ठेवण्यासाठी जागा पण भरपूर मिळाली, बाजारभाव पण जास्त मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बाजार समितीची वसुली (फी) वाढली आहे; परंतु आता व्यापार्यांनी काही मूठभर लोकांना हाताशी धरून हवेलीतील छोट्या शेतकर्यांवर दबाव आणत आहेत. त्यामुळे पुणे व मुंबईला माल घेऊन जाणारे व्यापारी सुद्धा संप करून मांजरी येथील व्यापार्यांना पाठिंबा देत आहे; परंतु मांजरी बाजारात व पुणे मुंबईच्या बाजारात फरक असून व्यापार्यांनी शेतकर्यांचा अंत पाहु नये. नाहीतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठे एक झाले होते तसे शेतकरी पण एक होऊन व्यापार्यांना एक गड्डी पण देणार नाहीत.
हवेलीतील काही मूठभर लोकांना व्यापारी हाताशी धरून छोट्या शेतकर्यांवर दबाव आणत आहे; परंतु हवेलीतील संपूर्ण शेतकरी हा संचालक मंडळाच्या बाजूने असून संचालक मंडळाने या व्यापार्यांना परवानगी देऊ नये. येणार्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये हवेली तालुक्यातील शेतकरी हे जे मूठभर लोक व्यापार्यांच्या बाजूने आहेत त्यांचे सगेसोयरे, पाहुणेरावळे व ते स्वतः यशवंत कारखाच्या निवडणुकीत उभे राहिले तर पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शिवाजी काळभोर व अनेक शेतकर्यांनी दिला.
मांजरी बाजार हा शेतकर्यांचा असून, इतर तालुक्यातील शेतकर्यांनी पण शेतमाल विक्रीसाठी आणावा हा शेतकरी बाजार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही शेतकर्यांना माल विक्रीचा अधिकार आहे.
-दिलीप काळभोर, सभापती हवेली बाजार समिती
शेतकरी संघटना शेतकरी की व्यापार्यांची
एक शेतकरी संघटना व्यापार्यांची बाजू घेत असून ही संघटना खरोखरच शेतकर्यांची आहे की व्यापार्यांची, अशी टीका शेतकर्यांनी केली. एकीकडे व्यापार्यांसाठी बाजार समितीला निवेदन द्यायचे आणि दुसरीकडे शेतकर्यांसाठी मटणाचे जेवण ठेवायचे, मग आमचा शेतकरी एवढा लालची आहे का. या शेतकरी संघटनेचा अनेक शेतकर्यांनी धिक्कार केला आहे. असल्या संघटनेचा शेतकर्यांनी निषेध केला पाहिजे.





