पुणे जिल्हा : राष्ट्रवादीत मीठाचा खडा टाकण्याच काम अदृश शक्तीचे

खासदार सुप्रिया सुळे यांचे विरोधांवर टिकास्र
जळोची – निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सुनावणीला पवार साहेब उपस्थित राहिलेले आहेत. शेवटी आपल्या लोकांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांचे ‘बाळ’ आहे. ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कुटुंबाप्रमाणे त्यांनी पक्ष सांभाळला, वाढवला आहे.
सत्ता आली त्यावेळी राज्याला आणि देशाला नेतृत्व मिळाले. २५ वर्षे आदर आणि खेळीमेळीच्या वातावरणात पक्ष चालला. मात्र, दुर्दैवाने या चांगल्या वातावरणात मीठ टाकण्याचे पाप.. एका अदृश्य शक्तीने केले आहे, टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता विरोधांवर केली.
बारामतीमध्ये खासदार सुळे यांच्या संकल्पनेतून आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे.
खासदार सुळे म्हणाल्या की, शिवसेनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष आपलाच असल्याचा दावा केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा पक्ष काढण्याचे भाष्य केले होते. या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मी एवढा विचार केलेला नाही. आमच्या आयुष्यात सध्या संघर्षाचा काळ आहे.. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षाचा काळ येतो. शेवट सत्यमेव जयते. असे त्यांनी सांगितले.
विरोधी बोलला की आईस केले जाते
रोहित पवारांच्या चौकशीबाबत खासदार सुळे म्हणाल्या की, विरोधी बोलला की, त्याला ‘आईस केलं जातं म्हणजे.. इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, ही नवीन पद्धत मागील आठ दहा वर्षापासून देशात सुरू झाली आहे. कदाचित याच कारणामुळे रोहित पवारांना नोटीस आली असावी. अशी दबकी चर्चा समाजात ऐकू येत आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी कश्मीर ते कन्याकुमारी ज्या ज्या लोकांवर आरोप केले. ते भाजपमध्ये गेले त्यांच्या केसचे काय झाले. असा प्रश्न उपस्थित केला. भाजप आरोप करणाऱ्यांना त्यांच्या पक्षात घेते. तेव्हा ते वॉशिंग मशीनद्वारे जातात कुठे, अशी विचारणा त्यांनी केली.





