Pune District : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल

नऊ वर्षांनंतर लोकनियुक्त नगरसेवकांची निवड होणार
बारामती – तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. सोमवारी (दि. 18) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी अधिकृत प्रभागरचना जाहीर केली. या प्रभागरचनेवर 31 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत.
बारामती नगरपरिषदेत 20 प्रभागांतून 41 नगरसेवक निवडून येणार आहेत. यामध्ये 19 प्रभागांमधून प्रत्येकी दोन नगरसेवक तर 20व्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. एकूण जागांपैकी 50 टक्के जागा महिला आरक्षणाखाली असल्याने नगरपरिषदेत महिलांचे भक्कम प्रतिनिधित्व निश्चित झाले आहे.
बारामती नगरपरिषदेची शेवटची निवडणूक 14 डिसेंबर 2016 रोजी झाली होती. या नगरपरिषदेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2022 रोजी संपुष्टात आला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता नव्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु होत आहे. तब्बल तीन वर्षांपेक्षा अधिक काळ नगरपरिषदेवर प्रशासक राज होते. निवडणुकीचा बिगुल वाजताच इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणत्या प्रभागातून उमेदवारी अर्ज करायची, पर्यायी प्रभाग कोणते असतील याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा राजकीय उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
नगराध्यक्षपद सस्पेन्समध्ये
बारामती ही पुणे जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपरिषद असून सर्वाधिक नगरसेवक संख्या असलेली परिषद आहे. मात्र नगराध्यक्षपदाचं आरक्षण अजून निश्चित झालेले नसल्याने नगराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 26 ते 30 सप्टेंबरदरम्यान अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर दिवाळीनंतर नगरपरिषदेची निवडणूक होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.





