पुणे जिल्हा : वाघोलीकरांचा स्वाभिमान गहाण टाकला नाही – माऊली कटके

शक्ती प्रदर्शन करीत प्रचाराच्या सांगता सभेला अलोट गर्दी
वाघोली/लोणीकंद – शिरूरमध्ये दोन लाख तर हवेली तालुक्यात सुमारे अडीच लाख मतदान आहे. यातील तब्बल 68 हजार मतदान एकट्या वाघोलीत आहे. आणि या वाघोलीचा भूमिपूत्र आज निवडणुकीत उभा आहे. बाहेर चर्चा होत्या की वाघोलीकरांना विकत घेऊ; पण आम्ही आमचा स्वाभीमान एवढाही गहाण टाकला नाही की आम्हाला कोणी विकत घेऊ शकेल. तुमच्याकडे पैसा असेल; परंतु मायमाउलींचे प्रेम या भूमिपुत्रावर आहे.त्यामुळे उद्याच्या 20 तारखेला त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम जनता नक्की करेल, असा विश्वास शिरूर-हवेली मतदारसंघाचे राश्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांनी व्यक्त केला.
शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी (दि. 18) जोरदार शक्तीप्रदर्शनाने मतदार संघातील सर्वाधिक मतदार असणार्या वाघोली येथे झाली. आजच्या प्रचाराचा शेवटच्या दिवशी वाघोली परिसरातील भावडी, लोणीकंद, बकोरी, केसनंद, कोलवडी, आव्हाळवाडी या गावांमध्ये दिवसभर गाव भेट दौर्यामध्ये नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद पहावयास मिळाला.
त्यानंतर दुपारी वाघोली येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वाघेश्वर मंदिर येथून सुरुवात झाल्यानंतर वाघोली गावठाण मार्गे केसनंद फाटा येथील कटके यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर प्रचाराची सांगता झाली, यावेळी महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे पाहायला मिळाले. आयोजित पदयात्रेत वाघोलीतील महिला, तरुण, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माऊली कटके म्हणाले, गेली 15 वर्षे मोठ्या भावाप्रमाणे आपण शिरूरला संधी दिली. आता लहान भावाची वेळ आहे. इतिहासात पहिल्यांदा आपल्या तिकिट मिळाले आहे. आपल्या भवितव्याची निवडणूक आहे. जर कोणी गावाला वेठीस धरून नेण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे.
सर्वसामान्य जनतेला गेली 15 वर्षे अनेक आश्वासने दिली; मात्र या आश्वासनांवर खेळविण्याचे काम केले. त्यामुळे तिकीट आणण्याचे काम मी केले आहे. आता निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे आणि येणारा आमदार हा वाघोलीचाच करायचा आहे. हक्काचाच करायचा आहे.
यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, संदीपआबा सातव यांसह महीयुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समोर महिला वर्ग तरूण मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म्हसोबाच्या साक्षीने सांगतो माऊलीच आमदार -प्रदीप कंद
पुणे जिल्ह्यात शिरूर-हवेलीची निवडणूक चुरशीची निवडणूक समजली जाते. भाजप मधील इच्छुक प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत संपूर्ण प्रचार दौर्यामध्ये महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून आले. दरम्यान आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रदीप कंद यांच्या गावात माऊली कटके यांचा प्रचार दौरा असताना कंद यांनी म्हसोबा देवासमोर जे ठरलंय तेच ठरल्याचे सांगत माउली कटके यांना पेरणे, वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटासह संपूर्ण शिरूर-हवेली मधून प्रचंड मताधिक्य देण्याचे आवाहन केले.





