Pune District : नीरेत काद्यांला 3260 रुपये विक्रमी भाव

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात शनिवारी (दि. 15) झालेल्या लिलावामध्ये कांद्याला शेकडा 3260 असा विक्रमी भाव मिळाला आहे. शेतकर्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे व चांगला भाव मिळाल्यामुळे परिसरातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.तर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकर्यांना दर शनिवारी नीरा येथे भरणार्या लिलावाच्या वेळी आपला कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षे बंद पडलेला नीरा येथील कांदा बाजार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी या बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री झाली होती. यावर्षी देखील आता कांद्याची आवक नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली असून नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांना चांगला भाव मिळत आहे.
शनिवारी दुपारी एक वाजता नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव पार पडले, यावेळी कांद्याला शेकडा 3000 ते 3250 इतका भाव मिळाला, अशी माहिती नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे यांनी माध्यमांना दिली आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 210 पिशवी कांद्याची आवक झाली होती.
कांदा नायलॉनच्या पिशवीमध्ये आणू नका
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्यांनी शेतकर्यांनी कांदा विक्रीसाठी आणताना तो नायलॉनच्या पिशवीमध्ये आणू नये असे आवाहन केले आहे. त्याऐवजी पारंपारिक सुतळीची नवीन पिशवी कांद्यासाठी वापरावी, असे आवाहन व्यापार्यांच्यावतीने करण्यात आले आहे. तर सुतळीची पिशवी वापरल्याने कांदा चांगला राहतो त्याची साल निघत नाही. त्यामुळे तो दिसायला चांगला दिसतो. याउलट नायलॉनच्या पिशवीमध्ये कांदा आणल्यास कांद्याची साल निघते त्यामुळे कांदा दिसायला खराब दिसतो परिणामी दरामध्ये फरक पडतो, असे व्यापार्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.





